ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील नागरिकांना आता रेशन घरपोच मिळणार आहे. रेशनिंग अधिकाऱयांमार्फतच हे वितरण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.
मान यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गरीबांना रेशन घेण्यासाठी रेशन दुकानाच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं, ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. पंजाबमधील नागरिकांना आता रांगेत उभे राहून रेशन घ्यावे लागणार नाही. रेशन अधिकारीच रेशन घरपोच करतील. हातावर पोट असलेल्या लोकांना रेशनसाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांची रोजंदारी बुडते. तर काहींना दोन-दोन किलोमीटर रेशनसाठी पायी चालत जावे लागते. त्यामुळे सरकारने घरपोच रेशन देण्याची योजना सुरू केली आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही योजना रोखली होती. पण पंजाबमध्ये ही योजना सुरळीत चालू राहिल. रेशन घरपोच मिळाल्यास धान्याचा काळाबाजारही रोखला जाणार आहे.









