ऑनलाईन टीम / चंदीगढ :
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे. खासदार भगवंत मान हे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
भगवंत मान हे पंजाबमधील संग्रुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून, ते सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंजाब विधानसभेच्या 117 निवडणुकांसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आपकडून जोरदार तयारी सुरू आहे. केजरीवाल यांनी गेल्या आठवडय़ात एक मोबाईल नंबर जारी करुन पंजाबच्या जनेतला मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या आवडत्या उमेदवाराचे नाव देण्याचे आवाहन केले होते. भगवान मान यांना फोन आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून 93 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.
आज दुपारी केजरीवाल पंजाबमधील मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करणार होते. त्यापूर्वीच संपूर्ण शहरात भगवंत मान यांची पोस्टर्स लागली होती.








