नवी दिल्ली/प्रतिनिधी
सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे ती पंजाबमधल्या राजकीय भूकंपाची. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील आपापसातील मतभेद आणि पराकोटीचा वाद समोर आला आहे. एकूणच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसत आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनिष तिवारी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं कौतुक करत सध्याच्या राजकारणावरून नवज्योत सिंग सिद्धूवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
मनिष तिवारी यांनी घडलेल्या एकूण पत्रकारावर भाष्य केलं असून यांमुळे पंजाबमध्ये सध्या जे काही होत आहे. यामुळे पाकिस्तान आणि आयएसआय खूश होत असल्याचं ते म्हणाले. “पंजाबचा खासदार म्हणून पंजाबमध्ये होणाऱ्या घटनांमुळे दु:खी आहे. पंजाबमध्ये शांतता अत्यंत कठीण होती. १९८०-१९९५ मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आणि पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ हजार लोकांनी बलिदान दिलं. त्यात सर्वाधिक काँग्रेस कार्यकर्ते होते”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं. “पंजाबमध्ये राजकिय स्थिरता पुर्नस्थापित करणं गरजेचं आहे. नुकताच मी प्रादेशिक सुरक्षा परिषदेतून परतलो आहे आणि त्यात असं दिसतंय की, पंजाबमधील अस्थिरतेबाबत पाकिस्तान जास्त आनंदी असेल. जर पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता वाढली तर त्यांना पुन्हा आपला कट शिजवण्याची संधी मिळणार आहे”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं.










