वृत्तसंस्था/ चंदीगड
भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची केलेली शिफारस पंजाब शासनाने मागे घेतली. देशातील या सर्वोच्च पुरस्कारासाठी हरभजन पात्र नसल्याचा खुलासा शासनाकडून करण्यात आला.
चालू वर्षांतील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पंजाब शासनाकडून शिफारस का काढून घेतली याबद्दल अनेकांनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीतील या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणाऱया खेळाडूच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार या पुरस्कारासाठी आपली शिफारस होऊ शकत नाही, असे हरभजनने म्हटले आहे.
हरभजनने 2015 साली कसोटीत आणि वनडेत भारताचे शेवटचे प्रतिनिधीत्व केले होते. हरभजनने कसोटीत 417 तर वनडेत 269 बळी मिळविले आहेत. हरभजनला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देवून यापूर्वी गौरविण्यात आले आहे.









