प्रतिनिधी / बेंगळूर
लिंगायत पंचमसाली समुदायाला मागासवर्ग 2 अ प्रमाणे आरक्षण द्यावे, अशी मागणी करून बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर पंचमसाली समुदायाच्या स्वामीजींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळत आहे. शनिवारी मेळाव्यात काँग्रेस नेत्यांबरोबरच भाजप आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ व माजी मंत्री विजयानंद काशप्पनवर सहभागी झाले होते. त्यांनी या मेळाव्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर केल्याचा आरोप भाजपमधील आमदार आणि नेत्यांनी केला आहे.
विधानसौध येथे पंचमसाली समुदायातील मंत्री मुरुगेश निराणी, सी. सी. पाटील, आमदार शंकर पाटील मुनेनकोप्प, कळकप्पा बंडी, खासदार करडी संगण्णा आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पंचमसाली समुदायाच्या मेळाव्याचे काँग्रेस मेळाव्यात रुपांतर होण्यास आमदार यत्नाळ व माजी आमदार विजयानंद काशप्पनवर कारणीभूत आहेत. त्यांनी जयमृत्यूंजय स्वामी यांना आपल्या नियंत्रणाखाली आणून या दोन्ही नेत्यांनी समाजाचा दुरुपयोग चालविला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.









