-प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
घरगुती आणि सार्वजणिक गणेश मूर्तीचे विसर्जनाला पंचगंगा नदीत या वर्षीही बंदीच असून इराणी खणीत विसर्जन होणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डॉ. बलकवडे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना आल्या असून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये घरगुती गणेशमूर्ती 2 फुट तर मंडळांची गणेशमूर्ती 4 फुटांपर्यंतच असली पाहिजे. उत्सवा दरम्यान नागरिकांनी कोरोनाचे नियमांचे पालन करावे. 81 प्रभागात 160 कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले जाणार आहे. येथे अर्पण होणाऱया मूर्ती इराणी खणीत विसर्जनाला नेण्यासाठी 250 ट्रक्टर आणि टॅम्पो असणार आहेत. तसेच स्वच्छता स्पर्धाही घेतली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी टिपरच्या माध्यमातून जनजागृत्तीही केली जात आहे. कळंबा, मोरेवाडी येथील मंडळांनी त्यांच्या परिसरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. इराणी खणीतील गाळ काढण्यासाठी ठेका दिला असून सार्वजणिक गणेश विसर्जनानंतर गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुरग्रस्त घरांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून यानंतर घरफाळा, पाणीपट्टी सवलतीचा निर्णय घेतला जाणार आहे. रेडझोनमध्ये आटी व नियमाना अधीन राहूनच बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश संबंधितांना दिले असल्याचेही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
डेल्ट प्लस रूग्णांच्या संपर्कातील लोक निगेटिव्ह
शहरात 15 ऑगस्ट रोजी तीघांना डेल्ट प्लस झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. सध्या हे रूग्ण ठणठणीत असून त्यांच्या परिसरात सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आली. प्रत्येक 100 घरांची तपासणी केली असून तापाची लक्षणे असणाऱयांचे स्वॉब तपासणीसाठी घेतले होते. ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी दिली.
कोरोना मृत्यूदरही झाला कमी
शहरामध्ये कोरोनाचे केवळ 328 ऍक्टीव्ह रूग्ण असून त्यापैकी 35 जण घरी उपचार घेत आहेत. सहा कोविड सेंटर तत्पुरती बंद केली असून 6 सेंटर सुरू आहेत. 2.8 वरून पॉझिटीव्ह रेट 1.63 इतका आला आहे. तसेच 2 वरून 0.61 इतका मृत्यूदर झाला आहे.
कर्मचाऱयांचाही उच्च रक्तदाब तपासणी
महापालिकेकडून उच्च रक्तदाब नियंत्रण मोहिम सुरू आहे. महापालिकेतील सर्व कर्मचाऱयांची उच्च रक्तदाब तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.
45 वर्षावरील नागरिकांना रजिस्टर शिवाय लस
18 ते 44 वर्षावरील नागरिकांना पहिला डोस घेताना ऑनलाईन बुकींग करणे बंधनकारक आहे. परंतू 45 वर्षावरील नागरिकांना ऑनलाईन बुकींगची गरज नसून थेट लस दिली जाणार आहे. आतापर्यंत उद्दिष्टे पैकी 33 टक्के नागरिकांना पहिला डोस घेतला असून 60 वर्षावरील पुढील 80 टक्के नागरिकांना लस दिली आहे. दुसरा डोस लसीकरण 63 टक्के झाले आहे.
तिसऱया लाटेसाठीचे नियोजन
तिसऱया लाटेसाठी महापालिका प्रशासन तयारी सुरू केली आहे. आयसोलेशन हॉस्पिटल ऑक्सिजन प्लंट उभारला आहे. येथे रिफलींग प्लंट उभारण्यासाठी निधीची मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शहरातील 18 वयावरील व आतील रँडम्ली नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट करणार आहे.