प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा हद्दीतील पंचगंगा नदी पत्रात उडी टाकून आज एका महिलेने आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात करण्यात आली आहे, मात्र संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या साहायाने या महिलेचा मृतदेह नदी पत्रातून बाहेर काढण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास कसबा बावडा हद्दीतील पंचगंगा नदी पत्रात एक महिलेने नदीत उडी मारली आहे असं कॉल शिये परिसरातील शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांने अग्निशमन दल कडे केला.या महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली. साधारण वय 55 च्या सुमारास असून, कसबा बावडा येथे राहत असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. मात्र अद्याप नातेवाईकांनी संपर्क केला नसल्याने, या महिलेची ओळख पटू शकली नाही. तसेच आत्महत्येचं कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
आज सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास या महिलेने आत्महत्येच्या उद्देशाने बावडा हद्दीत नदीपात्रात उडी मारली. उडी मारल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तीने आरडाओरड केली, या आवाजाने आसपास शेतात काम करणाऱ्या शिये परिसरातील शेतकऱ्यांनी,आणि स्थानिकांनी तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे अडथळे येत होते. त्यामुळे तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन बचाव दलास देण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शिये पूलापासून पुढे बोटीच्या साहायाने या महिलेचा शोध घेण्यात आला, मात्र कुठंही आढळून आली नाही.
पाण्याला प्रवाह असल्याने लांब पर्यंत ही शोध मोहीम राबवण्यात आला. अखेर अर्ध्या तासांनी एक ते दिड किलोमीटर अंतरावर, हनुमान नगर, शिये घाट परिसरातील पत्रात ही महिला मृत अवस्थेत आढळून आली. या महिलेस अग्निशमन दलातील मनीष रणभिशे, जयवंत खोत, व अग्निशमन दल, तसेच आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे यांच्या टीमने नदी पत्रातून बाहेर काढले.








