परळी/प्रतिनिधी
राज्यातील पूरपरिस्थितीमुळे आलेलं संकट लक्षात घेता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत व्हावी यासाठी पंकजा यांनी आज परळी इथं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार माजला आहे. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारकडून मदत जाहीर केली आहे तरीही आपली मदत तिथपर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. यासाठी पंकजा यांनी मदत फेरी काढत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांना सध्या सोशल मीडियावर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत अशा पोस्ट फिरत असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आता हा विषय नाही. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. आता सगळं शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असं काही नाही, आता महाराष्ट्रावर आलेलं संकट आणि त्यासाठी समर्पण हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे”.
पूरग्रस्त भागात मी जाणार नाही, मदत पोहोचवणार
मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.