मल्टी एजेन्सी गटाच्या बैठकीत चर्चा – 380 नागरिकांची नावे सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पँडोरा पेपर्ससंबंधी एमएजीने (मल्टी एजेन्सी ग्रूप) स्वतःची चौकशी सुरू केली आहे. एमएजीचे पहिली बैठक अलिकडेच पार पडली आहे. सरकारपासून लपवून वेदेशात स्वतःची मालमत्ता आणि गुंतवणूक केल्याप्रकरणी अनेक भारतीय आणि त्यांच्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी सीबीडीटीचे प्रमुख जे.बी. महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एमएजीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत ईडी, रिझर्व्ह बँक आणि वित्तीय इंटेलिजेन्स युनिटचे अधिकारी सामील झाले.
शोधपत्रकारांच्या समुहाकडून आणखी नावे प्रसिद्ध होताच तपासाला वेग देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत 380 भारतीय नागरिक आणि भारतीय कंपन्यांची नावे समोर आली आहेत. पँडोरा पेपर्सच्या नावाने लीक झालेल्या कोटय़वधी दस्तऐवजांमध्ये भारतासह 91 देशांचे वर्तमान तसेच माजी नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींची आर्थिक रहस्यं उघड करण्याचा दावा केला गेला आहे.
गुप्त खात्यांच्या लाभार्थींमध्ये जॉर्डनचे शाह अब्दुल्ला द्वितीय, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर, चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस, केनियाचे राष्ट्रपती उहुरु केन्याटा आणि इक्वेडोरचे राष्ट्रपती गुइलेर्मो लासो यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी सामील आहेत.









