ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची आता दुसरी बैठक होणार आहे. त्यापूर्वी चीनने चार ठिकाणांपैकी तीन ठिकाणांहून आपले सैन्य काही अंतरावर मागे घेतले आहे. मात्र, पँगॉग टीएसओ तलावाच्या उत्तरेला भारत आणि चीनचे सैन्य अजूनही आमनेसामने आहे. येथे दोन्ही देशांच्या सैन्यांकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
चीनने गलवान व्हॅली, पीपी-१५ आणि हॉट स्प्रिंग्स येथून आपले सैन्य दोन ते अडीच किमी मागे घेतले आहे. चीनने सैन्य मागे घेतल्याने भारतानेही आपले काही सैन्य आणि वाहने या परिसरांमधून मागे हटवली आहेत. मात्र, पँगॉग तलाव क्षेत्रात दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आहे. पँगॉग टीएसओ तलावाच्या उत्तरेचा हा भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
दरम्यान, रविवारी दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल स्तरावर पहिली बैठक झाल्यानंतर चीनने नरमाईची भूमिका घेत सीमारेषेपासून सैन्य मागे हटवले होते. त्यानंतर सोमवारी चीनने पुन्हा एकदा कुरघोडी करत भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले होते. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले.









