भगवंत म्हणाले, उद्धवा ब्रह्मविद्या ही गुरुशिष्याच्या संवादातून उत्पन्न होते. गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखे मनन करीत रहावे म्हणजे रज व तम गुण नष्ट होतात आणि आत्मसुखाचा अनुभव येतो. मग गुणांना उत्पन्न करणारी मायाही त्या शुद्ध सत्वात लय पावते. देहाचा देहपणाच नाहीसा होतो. सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची खात्री असल्याने ब्रह्मज्ञानी साधकाला इतर गोष्टींचे अस्तित्व तसेच देहाशी संबंधित असलेल्या रागलोभादी भावना जाणवत नाहीत. तो सदासर्वकाळ ब्रह्मानंदात मश्गूल असतो.
अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोचली की, संसाराची निवृत्ती होते पण हे माझे सांगणे ज्यांना मान्य नसते ते साधकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की, सारे जीव एकरूपच आहेत हे खरे नव्हे कारण तसे असते तर एकाच्या सुखाने साऱयांनाच सुख झाले असते किंवा एकाच्या पापाने सारेच पातकी झाले असते. पण तसे घडत नाही. प्रत्येकाला वेगवेगळी कर्मे करावी लागतात व त्याप्रमाणे त्यांना भोग मिळतात यावरून जीव, भोग आणि काळ हे नित्य आहेत. तसेच गंध, पुष्प, स्त्री इत्यादि भोग्य पदार्थही नित्य आहेत. आत्मा आहे आणि जग नाही असे शक्मय नाही. या नित्य वस्तूंचा कर्ता कोण हे माहीत नाही म्हणून येथे ईश्वर नाहीच.
इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्षसुख निराळे आहे असे म्हणतात तोही अविचारच वाटतो. कारण इंद्रियांच्याद्वारे जीवांना प्रत्यक्ष सुख मिळताना दिसत असूनही हे मूर्ख लोक ते मानत नाहीत! ते म्हणतात, देहाशिवाय, विदेहपणाने कुणाला कधी सुख मिळालंय का? म्हणून निवृत्ती म्हणजे व्यर्थ कष्ट आहेत आणि प्रवृत्ती हीच अत्यंत श्रे÷ आहे. भगवंत म्हणाले, निवृत्तीपेक्षा प्रवृत्ती श्रे÷ असे म्हणतात.
परंतु प्रवृत्तीमध्ये काय कमी कष्ट आहेत का? प्रवृत्तीचे कष्ट काढता काढता एकदम मृत्यूचा घाला येतो. काळ नुसते मारतो असे नाही, तर आणखी नाना प्रकारच्या यातना भोगावयास लावतो आणि ज्यात अनिवार दुःखे असतात अशा गर्भवासात तो घालतो. म्हणून मी म्हणतो निरीश्वरवादी बोलतात ते खोटे आहे. प्रवृत्तीत मुळीच सुख नाही. काळ हा जीवाला योनीच्या द्वाराने कोटी कोटी जन्माचे फेरे करवितो.
जन्ममरणाच्या मधला काळ षड्विकार भरून काढतात. जीव हा स्वतंत्र कर्मकर्ता आहे असे म्हणतात पण जीवाला स्वतंत्रता असती, तर त्याच्या वाटय़ाला दुःख कधीच आले नसते. सदासर्वकाळ तो सुखीच राहिला असता आणि ज्यामुळे दुःख पदरी येते ते पापही त्याने कधी केले नसते पण असे कधीच घडत नाही. उलट जीव बिचारा नेहमीच दीन आणि बापुडवाणा असतो. म्हणून ईश्वरी सत्ता हीच सर्वश्रे÷ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे आणि जीव हा सुखदुःखाचा भोक्ता आहे. पण तो पराधीन असल्याने त्याला कसलीही स्वतंत्रता नसते.
ज्यांना यथासांग कर्म करणे कळत नाही, तेच जीव दुःखी होतात आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात असा एक समज आहे म्हणून माझे अस्तित्व नाकारून जे लोक यज्ञ करतात त्यांच्या पूजेतले पावित्र्यच निघून जाते. अरे माझ्या नामाचे सामर्थ्य असे आहे की कर्म करताना जर त्यात काही न्यून पडले तर तेथे माझे स्मरण करावे म्हणजे त्या नामानेच त्यातील न्यून पूर्ण होते. जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत, त्यांचे दैवच फुटके म्हणून समज.
उलट माझ्या ठिकाणी श्रद्धा असलेले त्यामुळे माझे साधेभोळे भक्त अत्यंत सुखात असतात. गोपाळांनी कोणते कर्म केले होते? गोपींना माझी आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोहोचल्या. कर्मठ केवळ अभिमानानेच सकाम कर्मात सुख आहे असे मानतात.
पुढे ऐक, अंतकाळी कनक आणि कांता यांच्यावरील प्रेमामुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही. म्हणून उद्धवा अविनाश गोडी निर्विषयातच आहे आणि एकदा या अविनाशी सुखाची चव ज्यांनी चाखलेली असते ना, ते कर्म करून सुख भोगावे या कर्मवाद्यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष करतात.
क्रमशः








