प्रतिनिधी/ डिचोली
न्हावेली सांखळी येथे पश्चिम बंगालच्या युवकाच्या खूनाचा छडा लवण्यात डिचोली पोलिसांना यश आले असून मयताचा चुलत भाऊ व चुलत भाच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर खून कौटुंबिक कलहातून सदर प्रकार घडल्याचे तपासणीअंती समोर आले आहे असून तिघांनाही डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी उत्तर गोव्यातील वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी डिचोलीत ठाण मांडले होते.
या प्रकरणात पोलिसांनी मयताचा चुलत भाऊ चांदमिय जब्बार (35), चुलत भाचा मिशान रेहमान (23) व संजय पास्वान (40) मूळ बिहार या तिघांना अटक केली आहे.
खून झालेला जमिदार रेहमान हा 15 सप्टें. पासून बेपत्ता असल्याची तक्रार चांदमिया जब्बारने दिली होती. त्यानंतर दि. 19 सप्टें. रोजी न्हावेलीतील मोहीत इस्पात कंपनीच्या बाजूलाच झाडीत जमिदारचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे तुकडे करून चार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून फेकण्यात आले होते.
सदर माहिती मिळताच उपमहानिरीक्षक परमादित्य आयपीएस व गुन्हा अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक उत्कृष्ट प्रसुन्न, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पोलीस निरीक्षक संजय दळवी, वाळपईचे निरीक्षक सागर एकोसकर, पेडणेचे निरीक्षक संदेश चोडणकर, म्हापसाचे निरीक्षक तुषार लोटलीकर, पणजीचे निरीक्षक सुदेश नाईक, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तगुरु सावंत, फिलोमेन कॉस्ता व सतीश गावडे. उपनिरीक्षक किशोर रामानंद, प्रसाद पाळणी, प्रजीत मांदेकर व दिपेश शेटकर यांनी या तपासकार्यात सहभाग घेतला.
15 रोजी खून, 16 रोजी तक्रार
खून झालेल्या जमिदारकडे चांदमियाने दि. 15 सप्टें. रोजी सांखळीतील स्टेट बँकेत भरण्यासाठी 2 लाख 33 हजार रूपये दिले होते. ते भरण्यासाठी तो सकाळी बँकेत गेला असता गर्दी असल्याने परत आला व दुपारी मोहीत इस्पात येथे कामगारांसाठी असलेल्या खोलीत बसला होता. याच दरम्यान वरील तिघेही संशयित खोलीत आले आणि त्यांनी त्याची विचारणा केली. यावेळी आपण नंतर पैसे भरणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी इतर खोल्यांमध्ये कोणीच नसल्याची संधी साधत तिघांनीही त्याचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर दुसऱया दिवशी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
पैसे घेऊन पळाल्याचा केला बहाणा
जमेदार हा बँकेत भरायला दिलेले 2 लाख 33 हजार रूपये घेऊन पळून गेला वा त्याला कोणीतरी गायब केल्याचा बहाणा या तिघांनी करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्या खोलीची झडती घेतली असता रक्ताचे डाग आढळून आले. त्यावरून चांदमियाची उलटतपासणी केली असता मिळलेल्या महितीत तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दुसरा संशयित रेहमानला तपासणीसाठी घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने संपूर्ण प्रकरण कथन केले.
दुर्गंधी येऊ लागल्याने प्रकरण उघडकीस
सदर पिशव्यांमधील मृतदेहाचे तुकडे श्वानांनी बाहेर काढून अस्ताव्यस्त टाकले होते. त्यामुळे भागात दुर्गंधी पसरली होती. दुर्गंधी येत असल्याने कोणीतरी कुंपणाच्या बाहेर जाऊन पाहिले असता मानवी अवयव निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणात मोहीत इस्पात कंपनीतील 500 कामगारांची चौकशी करण्यात आली. त्यामुळेच या प्रकरणाचा 24 तासांत छडा लावणे शक्मय झाले. अटक करण्यात आलेल्या तिघांनाही दहा दिवस रिमांडवर घेण्यात आले आहे.









