प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील न्यू मार्केट परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी येथील व्यापाऱयांनी दाखविली आहे. मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची काही व्यापाऱयांनी भेट घेऊन आपल्या काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या असता आवश्यक तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱयांनी व्यापाऱयांना दिले.
नगराध्यक्षा पूजा नाईक यांची भेट घेण्यासाठी न्यू मार्केटमधील व्यापाऱयांचे प्रतिनिधी मंडळ गेले होते. नगराध्यक्षा उपलब्ध नसल्याने मुख्याधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केल्याची माहिती या पथकातील व्यापारी मोहनदास बोरकर यांनी दिली. मडगावातील शहरी भागात गजबजलेल्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी दिवसाढवळय़ा गोळी झाडून खून करण्याचा प्रकार घडल्याने सुरक्षाविषयक बाबींना महत्त्व आले असून नुकतीच मडगावातील व्यापाऱयांसोबत पोलीस खात्याचे डीजीपी मीना यांनी बैठक घेऊन चर्चा केली होती.
व्यापाऱयांनी शुक्रवारी मुख्याधिकाऱयांची भेट घेतली असता न्यू मार्केटच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच अन्य आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज व्यक्त केली. सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून यासाठी न्यू मार्केटमधील व्यापारी स्वखर्चाने असे कॅमेरे लावण्यास राजी असल्याचे नजरेस आणून दिले असता मुख्याधिकाऱयांनी त्याचे स्वागत केले. तसा पत्रव्यवहार पालिका तसेच पोलीस, प्रशासनाशी करण्यास त्यांनी सूचित केले.
विजेचे साहित्य बदलण्याची मागणी
न्यू मार्केटमधील वीजबत्तीसाठीच्या तारा तसेच टय़ुबलाईट व अन्य उपकरणे लवकरात लवकर बदलून देण्याची मागणी व्यापाऱयांनी यावेळी केली व गरज भासल्यास काही टय़ुबलाईट व उपकरणे स्वखर्चाने उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. मुख्याधिकाऱयांनी आपण अभियंता व इलेक्ट्रिशियन्सना पाठवून सर्वेक्षण करण्यास सांगतो व समस्या जाग्यावर घालतो, असे आश्वासन व्यापाऱयांना दिले.
सुरक्षारक्षकांसंदर्भात जुन्या पद्धतीचा प्रस्ताव
न्यू मार्केटमध्ये तैनात सुरक्षारक्षकांना पूर्वी व्यापारी पैसे गोळा करून वेतन देत होते. अलीकडे पालिकेतर्फे सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येतात. त्यामुळे काही वेळा अडचणीचा सामना करावा लागतो. यावर तोडगा म्हणून व्यापारी पूर्वीप्रमाणे सुरक्षारक्षक नियुक्त करून त्यांचे वेतन फेडण्यास तयार आहेत असा प्रस्ताव यावेळी व्यापाऱयांनी मुख्याधिकाऱयांसमोर ठेवल्याची माहिती बोरकर यांनी दिली.
मागण्या मंडळासमोर ठेवणार : मुख्याधिकारी
व्यापार परवाने हस्तांतरित करणे, अन्य आवश्यक ना हरकत दाखले, सोपो विपेत्यांना व्यापार परवाने उपलब्ध करून देणे, सुमारे 30 टक्के व्यापाऱयांच्या दुकानांना शटर नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना शटर बसविण्यास मंजुरी देणे अशा काही मागण्या व्यापाऱयांनी मांडल्या. सर्व मागण्या आपण मंजूर करू शकत नसून काही निर्णय मार्केट समिती व पालिका मंडळाने घ्यायचे असतात. आपण व्यापाऱयांच्या मागण्या मंडळासमोर ठेवेन, असे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले.
दुचाक्यांवरील कारवाई स्थगित ठेवावी
कोविडच्या पार्श्वभूमीवर न्यू मार्केटमधील दुकानदारांना ग्राहक नसल्याने बराच फटका बसला होता. मात्र आता आताच ग्राहक बाजारपेठेत फिरकू लागले आहेत. अशात पार्किंगच्या समस्येमुळेही येथील बाजारपेठांना फटका बसतो. त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे पालिकेकडून दुचाक्मया उचलल्या जात असल्याने ग्राहक बाजारात येणे टाळतात. त्यामुळे दुचाक्यांवर होणारी कारवाई पार्किंग प्लाझा प्रत्यक्षात उतरेपर्यंत स्थगित ठेवावी, अशीही मागणी या व्यापाऱयांच्या पथकाने उचलून धरली.









