वृत्तसंस्था/ चेन्नई
अमेरिकेच्या हिकारु नाकामुराचे कडवे आव्हान परतावून लावत नॉर्वेचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरमधील पाचव्या टप्प्याचे जेतेपद पटकावले. त्याने 1.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेचे पाचव्या प्रयत्नात पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे. त्याने नाकामुरावर 3-1 असा विजय मिळवित न्यू इन चेस क्लासिकचे जेतेपद पटकावले.
त्याला जेतेपदाचे 30,000 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस मिळाले तर 50 टूर गुण मिळाल्याने त्याने वेस्ली सो याला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. कडवी झुंज दिलेल्या नाकामुराला 15,000 डॉलर्स मिळाले.
पहिल्या दिवशी नाकामुराला एका सेटने मागे पडला होता. त्याने पहिल्या डावात पूर्ण वर्चस्व राखले होते. दुसऱया डावातही नाकामुराचे वर्चस्व राहिले त्यावेळी कार्लसन हरणार असेच वाटत होते. पण या सेटमध्ये पुढे चालींची पुनरावृत्ती करीत त्याने कार्लसनला बरोबरीची संधी दिली. कार्लसनने शिताफीने सुटका करून घेतली आणि नाकामुराने सुवर्णसंधी दवडली. हाच या लढतीतील टर्निंग पॉईंट ठरला. †ितसऱया डावातही त्याने अति आक्रमक खेळ केला. पण कच्चा दुवा सापडल्यानंतर कार्लसनने त्याचा अचूक फायदा उठवला आणि नाकामुराला त्याच्या चुकीचे परिणाम भोगायला लावले. नाकामुराची आघाडी गेली आणि चौथा डाव त्याला जिंकलाच पाहिजे, अशी स्थिती निर्माण झाली. कार्लसनला फक्त बरोबरीची गरज होती आणि त्याने तसा खेळही केला. बरोबरीसाठी नाकामुराने अखेर संमती दिली आणि न्यू इन चेस क्लासिकचे जेतेपद कार्लसनने पटकावले.
दरम्यान, शाख्रियार मॅमेद्यारोव्ह चेस टूरवरील पहिल्या स्पर्धेत लेव्हॉन ऍरोनियनला 2.5-0.5 असे हरवून तिसरे स्थान पटकावले. आता मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरचा सहावा टप्पा 23 मेपासून सुरू होणार आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे अंतिम स्पर्धा होणार असून त्याआधी चार स्पर्धा होणार आहेत.









