वृत्त संस्था/ न्यूयॉर्क
रविवारी येथे झालेल्या 2021 न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व निर्विवाद राखताना पुरूष आणि महिलांच्या खुल्या गटातील विजेतेपद पटकाविले. महिला गटात केनियाची पेरेस जेपचिरचिरने तर पुरूषांच्या विभागात अल्बर्ट कोरिरने विजेतेपद हस्तगत केले.
न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन जिंकणारी केनियाची जेपचिरचिर ही पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन ठरली आहे. व्हील चेअर विभागात ऑस्ट्रेलियाच्या मॅडिसन रोझारिओ आणि स्वित्झर्लंडच्या मार्सेलने विविध गटात विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या खुल्या विभागात केनियाची जेपचिरचिरने दोन तास, 22 मिनिटे, 39 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात जेपचिरचिरने तिसऱया क्रमाकांची जलद वेळ नोंदविली. महिलांच्या विभागात केनियाच्या चेपटुपटुने दुसरे स्थान तर इथोपियाच्या येसानेहने तिसरे स्थान मिळविले. पुरूषांच्या खुल्या विभागात केनियाच्या कोरीरने दोन तास, 08.22 सेकंदाचा कालावधी नोंदवित पहिले स्थान मिळविले. मोरोक्कोच्या मोहम्मद येराबायने दुसरे तर इटलीच्या फॅनियलने तिसरे स्थान मिळविले.









