अमेरिकेतले न्यूयॉर्क आपल्या मुंबईसारखेच आहे असे म्हणतात.
न्यूयॉर्क देखील बंदर आहे. त्यांच्या देशातले सर्वाधिक दाट लोकवस्तीचे शहर आहे. तिथेही परप्रांतीय भरपूर आहेत. त्यांना फक्त तिकडे इमिग्रंट्स म्हणतात. गेल्या शतकात मुंबईवर ‘बंबई मेरी जान’, किंवा ‘जिवाची मुंबई’ अशा भाषेत भावूक लेखन झाले. तसे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ओ हेन्री या लेखकाने न्यू यॉर्कवर भरभरून कथालेखन केले. ते तेव्हाच्या मध्यमवर्गाने पसंत केले. त्यावर चित्रपट निघाले. मुंबईतल्या टोळीयुद्धावर कथा-कादंबऱया-सिनेमे निघाले आणि त्यावर असंख्य कलाकारांची उपजीविका झाली तसे तिकडे देखील न्यूयॉर्कमधल्या टोळीयुद्धावर ‘द गॉडफादर’ कादंबरी आणि सिनेमे निघून अनेक लेखक आणि कलाकारांची ऐश झाली.
मुंबई देशातले सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे, त्याला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात. न्यूयॉर्क देखील जगातील आठव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेले शहर आहे. इथे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज आणि नासडॅकची कार्यालये आहेत. शहरात दिवसाचे चोवीस तास जाग असते. त्यामुळे त्याला ‘कधी न झोपणारे शहर’ (सिटी दॅट नेव्हर स्लिप्स) असे म्हणतात. मुंबईदेखील जवळपास तशीच कार्यरत असते.
दोन्ही शहरातल्या साम्यस्थळांची यादी अशी बरीच वाढवता येईल. पण आता फरक देखील बघून घेऊ. काही महिन्यांपूर्वी अवघ्या जगावर कोरोनाचे संकट आले. हवामानातील फरक वगळता मुंबईप्रमाणेच सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि औद्योगिक स्थिती असलेल्या न्यूयॉर्कमध्ये साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाने पछाडले. बावीस हजारांहून अधिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले. पाठोपाठ आपल्या मुंबईवर देखील हा हल्ला झाला. गेल्या महिन्यात मुंबईची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाने अंदाज वर्तवला की मे महिन्याच्या मध्यास मुंबईत पंधरा लाख नागरिकांना कोरोनाची लागण होईल.
पण भारतीयांच्या अंगभूत प्रतिकारशक्तीमुळे म्हणा की स्थानिक सरकारच्या खबरदारीने, भारतातल्या विशिष्ट हवामानामुळे म्हणा की काही दशकांपूर्वी सरकारने टोचलेल्या बीसीजी लसीकरणामुळे, तसे झाले नाही. रोगाच्या संसर्गाचा आणि मृत्यूचा असे दोन्ही आकडे न्यूयॉर्कच्या तुलनेत खूपच कमी राहिले. असेच कमी राहो. मुंबई आणि महाराष्ट्र आणि आपला देश यात अमेरिकेच्या खूप मागे पडो!








