ऑनलाईन टीम / गोवा :
अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद सोमणने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नग्न फोटोशूट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा फोटो सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद सोमण विरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी वयाच्या मिलिंद सोमणने 55 व्या वर्षात पदार्पण केले. स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केले होते आणि त्याने ते सोशल मीडिया अकाऊंट्सवरून प्रसिद्धही केले होते. यामध्ये त्याने ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असे कॅप्शन देखील दिले होते. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम 294 आणि सेक्शन 67 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचाने वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.‘मिलिंद सोमणने सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतिमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असे म्हणत गोवा सुरक्षा मंचाने वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचे चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आले होते.









