हॉकी लीगमधील सामने लांबणीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यूझीलंडने भारतातील कोरोनाची चिंताजनक स्थिती पाहून एफआयएच प्रो हॉकी लीगमधील सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिल्यामुळे या महिन्यात होणारे सामने लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय संघाची कौशल्य आजमावून पाहण्याची संधी हुकली आहे.
29 व 30 मे रोजी हे सामने भुवनेश्वरमध्ये खेळविण्यात येणार होते. ‘भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने न्यूझीलंडच्या पुरुष हॉकी संघाने भारताविरुद्धचे सामने खेळण्यासाठी ओडिशामध्ये येण्यास नकार दिला आहे,’ असे एका सूत्राने सांगितले. भारताला ऑलिम्पिक तयारीच्या दृष्टीने हे सामने महत्त्वाचे ठरणार होते. याआधीही भारताचा प्रो हॉकी लीगमधील युरोप दौरा याच कारणास्तव रद्द करण्यात आला होता. 8 व 9 मे रोजी ग्रेट ब्रिटनविरुद्ध भारताचे सामने लंडनमध्ये खेळविले जाणार होते. पण भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनने भारतीय प्रवाशांना व्हिसा नाकारल्यामुळे ते सामनेही लांबणीवर टाकावे लागले. त्यानंतर स्पेनमध्ये 15 व 16 मे रोजी होणारा टप्पाही लांबणीवर टाकण्यात आला. भारतीय प्रवाशांसाठी स्पेननेही निर्बंध घातल्याने हा निर्णय घ्यावा लागला. त्याचप्रमाणे जर्मनीनेही भारतीय प्रवाशांवर निर्बंध घातल्याने 22 व 23 मे रोजी या लीगमधील हॅम्बुर्गमध्ये होणारा टप्पाही लांबणीवर टाकण्यात आला आहे. गेल्या महिन्यात अर्जेन्टिनातील प्रो लीग टप्प्यात भाग घेतल्यानंतर भारताचे सर्व 33 ख्sाळाडू बेंगळूरमधील साई क्रीडा प्राधिकरण येथे ट्रेनिंग घेत आहेत.









