वेलिंग्टन / वृत्तसंस्था :
आघाडीचे जलद गोलंदाज दुखापतींमुळे त्रस्त असल्याने न्यूझीलंडला आपल्या जलद गोलंदाजांच्या ताफ्यात युवा खेळाडूंना समाविष्ट करणे भाग पडले असून भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्यांनी उंचापुरा गोलंदाज काईल जेमिसनला पाचारण केले आहे. 6 फूट 8 इंच अशी ताडमाड उंची लाभलेला काईल जेमिसन भारताविरुद्ध वनडे पदार्पण करेल, हे जवळपास निश्चित आहे. स्कॉट कग्लेईन व हमिश बेनेट यांचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले, हे या निवडीचे वैशिष्टय़ ठरले.
ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन व मॅट हेन्री हे जलद गोलंदाजी त्रिकुट दुखापतीमुळे मालिकेत उपलब्ध नाही. त्यामुळे यजमान संघासमोर अनेक चिंता आहेत. किल्ला या टोपण नावाने ओळखला जाणाऱया काईल जेमिसनने आपल्या उंचीचा पुरेपूर लाभ घेत प्रथमश्रेणी स्तरावर फलंदाजांना सातत्याने पेचात टाकले असून हीच मालिका त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित आहे.
‘टू-मीटर पीटर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक पीटर फुल्टॉन यांच्यापेक्षाही काईल जेमिसन उंच आहे. काईल जेमिसनची उंची 6 फूट 8 इंच अर्थात 2.03 मीटर इतकी आहे आणि यामुळे पीटर फुल्टॉन यांच्यापेक्षा जेमिसन अधिक उंच खेळाडू ठरला आहे, अशा आशयाचे ट्वीट किवीज संघाने 2016 मधील स्पर्धेदरम्यान केले होते.
जिम्मी नीशम व मिशेल सॅन्टनर हे अष्टपैलू पर्याय असतील तर फिरकीपटू ईश सोधीचा फक्त पहिल्या वनडेसाठी संघात समावेश केला गेला आहे. भारत अ-न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी झाल्यानंतर तो संघासाठी उपलब्ध होईल. 2019 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत अंतिम क्षणी निसटता पराभव स्वीकारावा लागल्यानंतर न्यूझीलंडसाठी ही पहिलीच वनडे मालिका आहे.
न्यूझीलंड वनडे संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), हमिश बेनेट, टॉम ब्लंडेल, कॉलिन डे ग्रँडहोम, मार्टिन गप्टील, काईल जेमिसन, स्कॉट कग्लेईन, टॉम लॅथम, जिम्मी नीशम, हेन्री निकोल्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी (पहिल्या वनडेसाठी), टीम साऊदी, रॉस टेलर.









