क्वीन्सटाऊन / वृत्तसंस्था
सध्या न्यूझीलंड दौऱयावर असलेल्या भारतीय महिला संघाला चौथ्या वनडे लढतीत आणखी एका नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे ‘ग्लोरिफाईड टी-20’चे स्वरुप लाभलेल्या या लढतीत न्यूझीलंड महिला संघाने 63 धावांनी एकतर्फी विजय नोंदवला आणि 5 सामन्यांच्या या मालिकेत आपली विजयी आघाडी 4-0 अशी भक्कम केली. न्यूझीलंड महिला संघाने 20 षटकात 5 बाद 191 धावांचा डेंगर रचला तर प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाचा डाव 17.5 षटकात 128 धावांमध्येच खुर्दा झाला.
किवीज संघातर्फे ऍमेलिया केरने अवघ्या 33 चेंडूत 68 धावांची आतषबाजी केली आणि याच जोरावर त्यांना दोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत सहज झेपावता आले. प्रत्युत्तरात भारतीय संघातर्फे टिनेजर फलंदाज रिचा घोषने 29 चेंडूत 52 धावांची आतषबाजी जरुर केली. पण, तिचे हे प्रयत्न अगदीच एकाकी ठरले. भारतीय संघाचा हा न्यूझीलंड दौऱयातील सलग पाचवा पराभव आहे. दौऱयाची सुरुवातीस झालेल्या एकमेव टी-20 लढतीतही भारताला पराभव पचवावा लागला होता.
भारतीय गोलंदाजी या चौथ्या वनडेत देखील निष्प्रभ ठरली. केवळ राजेश्वरी गायकवाडला प्रतिस्पर्धी फलंदाजांवर थोडाफार लगाम घालता आला. तिचे पृथक्करण 4 षटकात 26 धावात 1 बळी, असे राहिले. रेणुकाने 2 बळी घेतले असले तरी तिला 4 षटकात 33 धावा मोजाव्या लागल्या. मेघना सिंग (4 षटकात 1-45) व दीप्ती शर्मा (4 षटकात 1-49) यांचा ऍमेलियाने बराच समाचार घेतला. ऍमेलियाच्या 68 धावांच्या खेळीत 11 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
या लढतीत न्यूझीलंडने कर्णधार सोफी डीव्हाईन (24 चेंडूत 32) व सुझी बेट्स (26 चेंडूत 41) यांच्या 53 धावांच्या सलामीच्या बळावर उत्तम सुरुवात केली. पुढे ऍमेलिया व ऍमी सॅटरवेटे (16 चेंडूत 32) यांनी भारतीय गोलंदाजीचा आणखी उत्तम समाचार घेतला.
विजयासाठी 192 धावांचे आव्हान भारतासाठी कठीण होते. खराब फॉर्ममधील हरमनप्रीतला अंतिम एकादशमधून वगळले गेले असल्याने आणखी मर्यादा होत्या आणि याचेच प्रतिबिंब सामन्यातही उमटले. शफाली वर्मा (0), यास्तिका भाटिया (0), पूजा वस्त्रकार (4) पाठोपाठ तंबूत परतल्यानंतर नुकतेच हार्ड क्वारन्टाईन पूर्ण करणारी स्मृती मानधना (13) बाद झाली आणि पाहता पाहता 5 षटके पूर्ण होण्यापूर्वीच भारताची 4 बाद 19 अशी मोठी पडझड झाली.
रिचा व मिताली राज (28 चेंडूत 30) यांनी 77 धावांची भागीदारी साकारली. मात्र, त्यांचे प्रयत्न अजिबात पुरेसे ठरणार नव्हते. ऍमेलियाची भगिनी जेस हिने दोन बळी घेतले तर प्रॅन्सिस मकाय व हेलेय जेन्सन यांनी अनुक्रमे 2 व 3 बळींसह भारताला आणखी धक्के दिले. रिचाने 4 उत्तुंग षटकार व 4 चौकार फटकावले. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. रिचा बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती. रिचा तंबूत परतल्यानंतर भारताचे 6 फलंदाज अवघ्या 32 धावांमध्ये तंबूत परतले.
आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी अवघ्या 2 आठवडय़ांचा कालावधी बाकी असताना भारतीय संघाचा हा खराब फॉर्म प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासाठीही चिंता वाढवणारा ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेला दि. 4 मार्च रोजी यजमान न्यूझीलंड-विंडीज यांच्या लढतीने सुरुवात होत असून भारताची मोहीम दि. 6 मार्च रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढतीने सुरु होईल.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड महिला संघ ः 20 षटकात 5 बाद 191 (ऍमेलिया केर 33 चेंडूत 11 चौकार, 1 षटकारासह नाबाद 68, सुझी बेट्स 26 चेंडूत 7 चौकारांसह 41, सोफी डीव्हाईन 24 चेंडूत 32, सॅटरवेटे 16 चेंडूत 32. रेणुका सिंग 4 षटकात 2-33, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी).
भारतीय महिला संघ ः 17.5 षटकात सर्वबाद 128 (रिचा घोष 29 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 52, मिताली राज 28 चेंडूत 30, स्मृती मानधना 15 चेंडूत 13. ऍमेलिया केर 3-30, हेलेय जेन्सन 3-32, जेस केर 2-11, प्रॅन्सेस 2-22).
कोट्स
सांघिक प्रदर्शन साकारता आलेले नाही, त्याचमुळे या दौऱयात आम्हाला लागोपाठ पराभव पत्करावे लागले. यापूर्वी सांघिक खेळाच्या बळावर आम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाचे धक्के दिले होते. मात्र, सध्याची कामगिरी पाहता आगामी विश्वचषकात गोलंदाजी हा चिंतेचा मुद्दा ठरु शकतो.
-भारतीय कर्णधार मिताली राज
तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवता आल्याने आम्ही हा एकतर्फी विजय संपादन करु शकलो. काही वेळा आमच्यावर दडपण होते. मात्र, अशा परिस्थितीत दडपण व्यवस्थित हाताळत आम्ही यश खेचून आणण्यात यशस्वी ठरलो.
-न्यूझीलंडची कर्णधार सोफी डीव्हाईन









