किवीज फलंदाजी व पाक गोलंदाजी यांच्यात चुरस रंगण्याची अपेक्षा, दोघांना समान संधी
वृत्तसंस्था/ सिडनी
बलाढय़ न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज बुधवारी येथे होत असून कागदावर न्यूझीलंड संघ बलवान वाटत असला तरी त्यांना इतिहास व अनप्रेडिक्टेबल पाकिस्तानवर मात करण्याचे आव्हान या लढतीत पेलावे लागणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

न्यूझीलंडने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली तर पाकला चढउतारांना सामोरे जात नाटय़मयरीत्या उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडने ‘ग्रुप ऑफ डेथ’ मानल्या जाणाऱया गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, लंका, आयर्लंड यांच्यावर विजय मिळवित पहिले स्थान मिळविले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकला मात्र सुपर 12 फेरीच्या प्रारंभी महत्त्वाच्या दोन सामन्यात भारत व झिम्बाब्वेकडून पराभवाचे धक्के बसले. या फेरीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी परतीच्या प्रवासाची तयारीही सुरू केली होती. त्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने बलाढय़ द.आफ्रिकेला पराभवाचा धक्का देत पाकवर एकप्रकारे कृपाच केली. नंतर बांगलादेशविरुद्ध विजय मिळवित पाकने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात त्यांना बांगलादेशवर फक्त विजय मिळविण्याची गरज होती, ते त्यांनी संघर्ष करीत साध्य केले.
1992 मधील वनडे विश्वचषक स्पर्धेतही पाक संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत होते. पण त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेली उपांत्य लढत जिंकून पाकने नंतर वर्ल्ड कपही जिंकला होता. इतिहासही पाकच्या बाजूने असून यापूर्वी विश्वचषक उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडला तीन वेळा (वनडे 1992, 1999 आणि टी-20, 2007) हरविले आहे. न्यूझीलंडला ही मालिका खंडित करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल.
मानसिकता बदलण्याची गरज
व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये मोठय़ा स्टेजवर ऐनवेळी कच खाण्याची न्यूझीलंडची मानसिकताही लपून राहिलेली नाही. गेल्या चार वर्ल्ड कपमध्ये त्यांनी सातत्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, पण त्यापैकी एकदाही त्यांना जेतेपदापर्यंत मजल मारता आलेली नाही. गेल्या सात वर्षात न्यूझीलंडने तीन वर्ल्ड कप फायनल्स (वनडेत 2015, 2019 व टी-20 मध्ये 2021) लढती गमविल्या आहेत. यावेळी ऑस्टेलियातील कंडिशन न्यूझीलंडला अनुकूल ठरणारी असून सातत्य नसलेल्या पाकच्या बॅटिंग लाईनअपवर लवकर आघात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कर्णधार बाबर आझम अजूनही धावांसाठी झगडत असून मोहम्मद रिझवानचा सर्वोत्तम फॉर्मही हरवला आहे. बांगलादेशविरुद्ध केवळ 128 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही पाकची खूप दमछाक झाली होती.
फिलिप्स, मिचेल, विल्यम्सनवर भिस्त
किवीचे वेगवान दुक्कल ट्रेंट बोल्ट व टिम साऊदी यांनी याच मैदानावर ऑस्ट्रेलिया व लंकन फलंदाजांच्या आघाडी फळीचा फडशा पाडत आपल्या संघाला सहज विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. गोलंदाजी हे पाकचे बलस्थान असून किवी फलंदाजांना त्यांच्यावर वर्चस्व ठेवण्याची कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. डॅरील मिचेल दुखापतीतून परतल्यानंतर पूर्ण बहरात दिसून आला आहे. तो व त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन आणि फॉर्ममध्ये असलेला ग्लेन फिलिप्स यांना फलंदाजीचा मुख्य भार पेलावा लागेल. फिलिप्सचे दमदार प्रदर्शन झाले असून मागील तीन सामन्यात त्याने एक शतक व एक अर्धशतक नोंदवले आहे. विल्यम्सन प्रारंभी फारसा चमकला नाही. पण गेल्या दोन सामन्यात त्यानेही लक्षणीय योगदान दिले आहे. तो आपल्या संघाला आणखी एकदा अंतिम फेरी गाठून देण्याचा प्रयत्न करेल.
पाकची भिस्त गोलंदाजांवर
उपांत्य फेरीतील प्रवेश हा फ्ल्यूक नव्हता, हे सिद्ध करून दाखविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. इथवर पोहोचण्यात नशिबाची साथ त्यांना मिळाली असली तरी शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ यांच्यासह भेदक गोलंदाजी याचा त्यांच्या यशात प्रमुख वाटा आहे. दुखापतीतून परतल्यानंतर शाहीन आफ्रिदीला बऱयापैकी सूर गवसला असून शेवटच्या सामन्यात भेदक माऱयावर त्याने चार बळी टिपत बांगलादेशवर अंकुश राखला होता. येथील वातावरणाचा बऱयापैकी अंदाज आला असल्याने रौफही आपली भूमिका शांतपणे व व्यवस्थित पार पाडत आहे.
संभाव्य संघ ः न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, फिन ऍलेन, फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, ऍडम मिल्ने, इशा सोधी, लॉकी फर्ग्युसन, साऊदी, देव्हॉन कॉनवे, डॅरील मिचेल, जेम्स नीशम, बोल्ट.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), असिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, शान मसूद, मोहम्मद हॅरिस, इफ्तिखार अहमद, शदाब खान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासिम ज्युनियर, मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनेन, नसीम शाह. शाहीन आफ्रिदी.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून.
आजचा उपांत्य सामना
न्यूझीलंड वि. पाकिस्तान
स्थळ ः सिडनी, वेळ ः दु. 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क









