वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील दुसऱया सामन्यात मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 198 धावांनी दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिली कसोटी मोठय़ा फरकाने जिंकली होती. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत ही मालिका खेळविली गेली.
या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 364 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 293 धावांत आटोपल्याने दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 70 धावांची आघाडी मिळविली होती. दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 9 बाद 354 धावांवर घोषित करून न्यूझीलंडला विजयासाठी 426 धावांचे कठीण आव्हान दिले होते. न्यूझीलंडने 4 बाद 94 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली. त्यांचा दुसरा डाव 93.5 षटकांत 227 धावांत आटोपला. न्यूझीलंडच्या कॉनवे आणि ब्लंडेल या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 85 धावांची भागिदारी केली. उपाहारापूर्वी कॉनवे सिपमलाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कॉनवेने 188 चेंडूत 13 चौकारांसह 92 धावा जमविल्या. ब्लंडेलने 7 चौकारांसह 44 धावा केल्या. जॅन्सेनने त्याला झेलबाद केले. उपाहारानंतर जेनसेन जॅन्सेन रबाडा यांनी न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज लवकर गुंडाळले. न्यूझीलंडची स्थिती 9 बाद 227 असताना किरकोळ पावसामुळे पुन्हा काही वेळ खेळ थांबवावा लागला. पण पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली आणि केशव महाराजने न्यूझीलंडचा शेवटचा फलंदाज मॅट हेन्रीला पायचीत करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. न्यूझीलंडचा दुसरा डाव 93.5 षटकांत 227 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा, जॅन्सेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 3 तर सिपमलाने 1 गडी बाद केला.
या सामन्यात 8 बळी मिळविणाऱया दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाला ‘सामनावीर’ तर न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला ‘मालिकावीर’ घोषित करण्यात आले. हेन्रीने या मालिकेत 14 बळी मिळविले असून फलंदाजीत 58 धावा जमविल्या. ही मालिका बरोबरीत राहिल्याने न्यूझीलंड संघाला मायदेशात गेल्या 90 वर्षांत अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव 364, न्यूझीलंड प. डाव 293, दक्षिण आफ्रिका दु. डाव 9 बाद 354 डाव घोषित, न्यूझीलंड दु. डाव 93.5 षटकांत सर्वबाद 227 (कॉनवे 92, ब्लंडेल 44, मिचेल 24, ग्रॅण्डहोम 18, साऊदी 17, जेमिसन 12, वॅग्नर नाबाद 10, रबाडा 3-46, जॅन्सेन 3-63, केशव महाराज 3-75, सिपमला 1-29).









