सर्वप्रथम कोरोनाला केले पराभूत : निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कोरोना विषाणूच्या विरोधात देशाला विजय मिळवून देणाऱया न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी प्रचंड बहुमतासह निवडणुकीतही विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडमधील ही निवडणूक 19 सप्टेंबर रोजी प्रस्तावित होती, परंतु कोविड-19 च्या दुसऱया लाटेमुळे ती स्थगित करण्यात आली होती. न्यूझीलंडमध्ये शनिवारी मतदान पार पडले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. याचबरोबर जेसिंडा पुन्हा एकदा देशाची धुरा सांभाळण्यास सज्ज आहेत.
आर्डर्न यांच्या मध्यममार्गाकडे झुकलेल्या डाव्या लेबर पार्टीला 87 टक्क्यांपैकी 48.9 टक्के मते मिळाली आहेत. देशाने लेबर पार्टीला 50 वर्षांमध्ये सर्वाधिक समर्थन दर्शविले आहे. पक्ष प्रत्येक देशवासीयासाठी काम करणार असल्याचे जेसिंडा यांनी विजयानंतर बोलताना म्हटले आहे. मुख्य विरोधी पक्ष नॅशनल पार्टीला 27 टक्के मते मिळाली आहेत.
जेसिंडा यांची कारकीर्द
जेसिंडा वयाच्या 17 व्या वर्षीच राजकारणात दाखल झाल्या होत्या. 2008 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपद पटकाविले होते. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेयर आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान हेलन क्लार्क यांची सहाय्यिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ऑकलंडमध्ये साथीदार क्लार्क गेफोर्ड, मुलीसह त्या राहतात.
एकतर्फी बहुमत पहिल्यांदाच
मागील वर्षी सार्वत्रिक निवडणूक 23 सप्टेंबर 2017 रोजी पार पडली होती. 6 सप्टेंबर रोजी संसद विसर्जित करत निवडणूक घेण्यासाठी मार्ग मोकळा केला होता. 1996 मध्ये मिक्स्ड मेंबर प्रोपर्शनल रिप्रेझेंटेटिव्हच्या (एमएमपी) स्वरुपात ओळखल्या जाणाऱया संसदीय प्रणालीच्या प्रारंभानंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने न्यूझीलंडमध्ये एकतर्फी बहुमत प्राप्त केले आहे. यापूर्वीही एका नेत्याला बहुमत प्राप्त करण्यासारखी स्थिती होती, परंतु त्यांना हे शक्य झाले नव्हते.









