न्यूझीलंड देश आता कोरोनामुक्त होण्याच्या बेतात आहे. 50 लाख लोकसंख्येच्या या देशात आता केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात हा देश मोठी लोकसंख्या असणारा पहिला कोरोनामुक्त देश होण्याचा मान मिळवणार आहे. न्यूझीलंडच्या सरकारने प्रारंभापासूनच लॉकडाऊनसारखे कठोर उपाय योजल्याने या देशात कोरोनाचा मोठा शिरकाव होऊ शकला नव्हता. तथापि, मे महिन्याच्या प्रारंभी येथील रुग्णसंख्या 500 हून थोडीशी अधिक होती. या महिनाभरात बहुतेक सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
मे च्या 7 तारखेपासूनच येथील रुग्णसंख्या घटण्यास प्रारंभ झाला होता. आता केवळ एक नोंदणीकृत रुग्ण असल्याने या देशाला कोरोना पूर्णतः हटविण्यात लवकरच यश मिळेल, अशी शक्मयता आहे.
न्यूझीलंडमध्ये एकंदर बाधितांची संख्या 1 हजार 504 इतकी होती. गेल्या संपूर्ण एक आठवडय़ात येथे कोणताही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे आणखी एक आठवडय़ात नवा रुग्ण न आढळल्यास हा देश स्वतःला कोरोनामुक्त म्हणून घोषित करू शकतो, अशी स्थिती आहे.
जगात मात्र स्थिती चिंताजनक
न्यूझीलंडमधील कोरोना पूर्णतः आटोक्मयात येत असला तरी युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच आहे. सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा विपरित परिणाम झाला आहे. रुग्णसंख्या, मृत्यूसंख्या आणि मृत्यूचा दर या सर्व आघाडय़ांवर अमेरिकेत अद्यापही काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या संकटामुळे 4 कोटी 10 लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. या बेरोजगारांनी आता सरकारकडे साहाय्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केले आहेत. बेरोजगारांना साहाय्य करण्यासाठी अमेरिकेने 1 कोटी कोटी रुपयांची योजना नुकतीच घोषित केली आहे.
युरोपमध्ये स्थिती नियंत्रणात, पण…
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, नेदरलँड्स इत्यादी आर्थिकदृष्टय़ा प्रबळ युरोपियन देशांमधील कोरोना स्थिती आता काहीशी नियंत्रणात आली आहे. इटली या देशाने आता लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्या असून बरेचसे आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने आता युरोपातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 25 दिवसांवर पोहोचला आहे. तो तीस दिवसांवर पोहोचल्यास स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे घोषित करण्यात येणार आहे. युरोपातील देशांपैकी केवळ रशियात रुग्णसंख्या वाढत असून मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. रशियन सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कठोरपणे क्रियांन्वित करण्यासाठी पावले उचलली आहेत.
अमेरिकेत रुग्णसंख्या वाढतीच
कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या अमेरिकेत आता 1 लाख 1 हजाराहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात 370 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच या कालावधीत 8 हजार 527 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या न्यूयॉर्क या प्रांतात असून देशातील एकूण प्रांतांपैकी 30 प्रांतांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतही पुढील आठवडय़ापासून लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली जाणार आहे.
फिलिपाईन्स : लॉकडाऊन शिथिल

फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटेर्ट यांनी देशातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. या देशात एप्रिलच्या प्रारंभापासून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. देशातील रुग्णसंख्या आता समाधानकारकरीत्या आटोक्मयात आली असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, महामारी अद्याप संपलेली नसून नागरिकांनी निर्बंध शिथिलतेचा गैरफायदा उठवू नये, असे आवाहन त्यांनी केले. देशभरात सर्वत्र विलगीकरण कक्षांची संख्या वाढविण्याचाही आदेश त्यांनी दिला.
पाकिस्तानमध्ये 64 हजार पार

पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 64 हजार 28 इतकी झाली आहे. एका दिवसात 2 हजार 636 रुग्ण वाढले आहेत. तर मृतांची संख्या गेल्या 24 तासांत 57 ने वाढली असून एकंदर 1 हजार 317 झाली आहे. सर्वाधिक फटका सिंध प्रांताला बसला असून तेथे 25 हजाराहून अधिक रुग्ण आहेत तर पंजाब प्रांतात ही संख्या 23 हजारपर्यंत आहे. बलुचिस्तान, राजधानी इस्लामाबाद, खैबर पख्तुनख्वा इत्यादी स्थानी रुग्णसंख्या वाढत असून पाकच्या राष्ट्रीय सरकारने आर्थिक उपाययोजना केल्या आहेत.
चीनमध्ये नवे पाच रुग्ण

कोरोना विषाणूंचे केंद्रस्थान असणाऱया चीनमध्ये गेल्या 24 तासांत पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यासह देशातील एकूण बाधितांची संख्या आता 409 झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनमध्ये रुग्णसंख्या 82 हजाराहून अधिक होती. यापैकी साडेचार हजारहून अधिकांचा मृत्यू झाला असून उरलेले रुग्ण बरे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तथापि, गेल्या दोन आठवडय़ात वुहान व आसपासच्या परिसरात किरकोळ संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. तथापि, चीनमधील एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येते. या देशातील लॉकडाऊन आता संपला आहे.









