पहिली कसोटी, दुसरा दिवस : द. आफ्रिकन संघ 353 धावांनी पिछाडीवर
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
हेन्री निकोल्स (105), टॉम ब्लंडेल (96) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजयाच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. द. आफ्रिकेचा पहिला डाव 95 धावात गुंडाळल्यानंतर 3 बाद 116 या मागील धावसंख्येवरुन न्यूझीलंडने सर्वबाद 482 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर दिवसअखेर द. आफ्रिकेची दुसऱया डावातही 3 बाद 34 अशी दाणादाण उडाली. या कसोटीत द. आफ्रिकेचा संघ अद्याप 353 धावांनी पिछाडीवर आहे.
हॅग्ले ओव्हलवर सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात शुक्रवारी दिवसअखेर रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन 9 तर तेम्बा बवूमा 22 धावांवर नाबाद राहिले. पहिल्या डावाअखेर 387 धावांनी पिछाडीवर रहावे लागलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाची दुसऱया डावातही जोरदार पडझड झाली. सलामीवीर सॅरेल इर्वी डावातील दुसऱयाच चेंडूवर खातेही न उघडता बाद झाला तर कर्णधार डीन एल्गार (2) मॅट हेन्रीचा पहिला बळी ठरला. द. आफ्रिकेची यावेळी 2 बाद 2 अशी दैना उडाली.
नंतर साऊदीने एडन मॅरक्रमला बाद केले आणि द. आफ्रिकेची 3 बाद 4 अशी अवस्था झाली. त्यानंतर रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन व तेम्बा बवूमा यांनी आणखी धक्का बसणार नाही, याची दक्षता घेत तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 30 धावांची भागीदारी नोंदवली.
दिवसाच्या प्रारंभी, 3 बाद 116 या मागील धावसंख्येवरुन हेन्री निकोल्स व नील वॅग्नेर यांनी 75 धावांची भागीदारी साकारत न्यूझीलंडला भक्कम स्थिती प्राप्त करुन दिली. अखेर रबाडाने वॅग्नेरला बाद करत ही जोडी फोडली. पुढे निकोल्सने शानदार शतक साजरे केले आणि संघाची आघाडी भरभक्कम असेल, याची तजवीज केली. टॉम ब्लंडेल व कॉलिन डे ग्रँडहोम यांनीही उत्तम डाव साकारले. ब्लंडेल व मॅट हेन्री यांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा सातत्याने समाचार घेत शेवटच्या गडय़ासाठी 94 धावांची आश्चर्यकारक भागीदारी साकारली. न्यूझीलंडचा पहिला डाव 482 धावांवर आटोपला आणि डावाअखेर त्यांची आघाडी 387 धावांची राहिली.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद 95, न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 482 (हेन्री निकोल्स 163 चेंडूत 11 चौकारांसह 105, टॉम ब्लंडेल 138 चेंडूत 12 चौकारांसह 96, नील वॅग्नेर 56 चेंडूत 49, कॉलिन ग्रँडहोम 45, मॅट हेन्री 68 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 58. डय़ुआन ऑलिव्हिएर 3-100, रबाडा, जान्सन, मॅरक्रम प्रत्येकी 2 बळी, ग्लेन्टॉन स्टूरमन 1-124). द. आफ्रिका दुसरा डाव ः 9 षटकात 3 बाद 34 (बवूमा नाबाद 22. टीम साऊदी 2-20, हेन्री 1-13).









