यजमान संघाची 10 गडी राखून एकतर्फी बाजी, 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडी,
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
प्रतिकूल परिस्थितीत भारतीय फलंदाजांचे सर्व तंत्र शब्दशः उघडे पडते, याचा प्रत्यय न्यूझीलंड दौऱयातील पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा आला. सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 4 बाद 144 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली खरी. पण, उर्वरित 6 फलंदाज अवघ्या 47 धावांमध्येच गारद झाले आणि डाव 81 षटकात 191 धावांमध्येच आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दुसऱया डावात 9 धावांचे किरकोळ आव्हान यापूर्वी पहिल्या डावातही भारताला 165 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला होता.
भारताच्या दुसऱया डावात ट्रेंट बोल्ट (22 षटकात 4-39) व टीम साऊदी (21 षटकात 5-61) हे जलद गोलंदाज कर्दनकाळ ठरले. सीम व स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरणात खेळणे किती खडतर असते, याचा या उभयतांनी भारताला चांगलाच प्रत्यय आणून दिला. वास्तविक, बोल्ट व टीम साऊदी हे देखील जागतिक क्रिकेटमधील नव्या चेंडूवरील भेदक गोलंदाज आहेत. फक्त इतर गोलंदाजांच्या वाटय़ाला जो प्रसिद्धीचा झगमगाट आला, तो या दोघांच्या वाटय़ाला आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भारताला यापूर्वी 2018-19 मधील ऑस्ट्रेलियन दौऱयात पर्थमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, तो विदेशातील शेवटचा पराभव होता. वेलिंग्टनमधील या कसोटीत मात्र त्यांनी जी हाराकिरी केली, ती निश्चितच संघाच्या लौकिकाला मोठे भगदाड पाडणारी ठरली आहे. अनेक स्टार फलंदाजांचा समावेश असतानाही अशी हाराकिरी होणे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड व भारतीय संघव्यवस्थापनाला देखील चिंताप्रवण करायला लावणारी आहे. तसे पाहता, वेलिंग्टनमध्ये पहिल्या दिवशी दव आहे, हे लक्षात आल्यानंतरच त्याचे निम्मे खच्चीकरण झाले होते.
नाणेफेकीचा कौल अर्थातच महत्त्वाचा राहिला आणि पूर्ण चार दिवसातील एकाही सत्रात ते एकदाही आत्मविश्वासाने खेळताना दिसून आले नाहीत. केवळ मयांक अगरवालनेच काही टप्प्यात घरच्या भूमीत फलंदाजी करत असल्याप्रमाणे खेळ साकारला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात फुलर लेंग्थ, उसळणारे चेंडू टाकत धडकी भरवली तर दुसऱया डावात राऊंड द विकेट मारा करत फलंदाजांच्या बरगडीच्या दिशेने सातत्यपूर्ण मारा केला. याची फलिते त्यांना चार दिवसातच मिळाली.
रहाणे (75 चेंडूत 29) व विहारी (79 चेंडूत 15) यांना प्रदीर्घ संयमासाठी ओळखले जाते. पण, बोल्टच्या एका न वळलेल्या चेंडूने रहाणेची एकाग्रता भंगली. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो किंचीत तरी वळेल, असा रहाणेचा अंदाज होता. पण, त्याने जसा विचार केला होता, नेमके त्याच्या उलटे झाले. चेंडू वळलाच नाही आणि बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला, त्यावेळी रहाणेला निराशा होणे साहजिक होते.
विहारी देखील अशाच एका अप्रतिम गेमप्लॅनचा बळी ठरला. साऊदीने क्लासिकल आऊटस्विंगर टाकल्यानंतर तितक्याच नजाकतीने ऑफकटर टाकला आणि विहारीला त्रिफळा कधी उडाला, ते ही कळाले नाही. पहिल्या 20 मिनिटांच्या खेळातच भारताचे दोन अनुभवी फलंदाज स्विंग गोलंदाजीवर नामोहरम झाले आणि त्यानंतर भारताचा लवकरच धुव्वा उडणार, याचे संकेत मिळाले. प्रत्यक्षातही यापेक्षा वेगळे काही घडले नाही. साऊदीने 10 व्यांदा डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. या विजयासह न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिमध्ये 120 गुणांवर झेप घेतली तर भारतीय संघ 360 गुणांवर जैसे थे राहिला.
धावफलक
भारत पहिला डाव : सर्वबाद 165. न्यूझीलंड पहिला डाव : सर्वबाद 348. भारत दुसरा डाव : पृथ्वी शॉ झे. लॅथम, गो. बोल्ट 14 (30 चेंडूत 2 चौकार), मयांक अगरवाल झे. वॅटलिंग, गो. साऊदी 58 (99 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा त्रि. गो. बोल्ट 11 (81 चेंडू), विराट कोहली झे. वॅटलिंग, गो. बोल्ट 19 (43 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे झे. वॅटलिंग, गो. बोल्ट 29 (75 चेंडूत 5 चौकार), हनुमा विहारी त्रि. गो. साऊदी 15 (79 चेंडूत 2 चौकार), ऋषभ पंत झे. बोल्ट, गो. साऊदी 25 (41 चेंडूत 4 चौकार), रविचंद्रन अश्विन पायचीत गो. साऊदी 4 (11 चेंडूत 1 चौकार), इशांत शर्मा पायचीत गो. ग्रँडहोम 12 (21 चेंडूत 2 चौकार), मोहम्मद शमी नाबाद 2 (3 चेंडू), जसप्रित बुमराह झे. बदली खेळाडू (डॅरेल मिशेल), गो. साऊदी 0 (3 चेंडू). एकूण 81 षटकात सर्वबाद 191.
गडी बाद होण्याचा क्रम
1-27 (पृथ्वी शॉ, 7.4), 2-78 (पुजारा, 31.6), 3-96 (मयांक, 38.4), 4-113 (विराट, 45.2), 5-148 (रहाणे, 67.2), 6-148 (विहारी, 68.3), 7-162 (अश्विन, 72.3), 8-189 (इशांत, 79.2), 9-191 (ऋषभ पंत, 80.3), 10-191 (बुमराह, 80.6).
गोलंदाजी
टीम साऊदी 21-6-61-5, ट्रेंट बोल्ट 22-8-39-4, कॉलिन डे ग्रँडहोम 16-5-28-1, काईल जेमिसन 19-7-45-0, अजाज पटेल 3-0-18-0.
न्यूझीलंड दुसरा डाव (टार्गेट : 9 धावा): टॉम लॅथम नाबाद 7 (4 चेंडूत 1 चौकार), टॉम ब्लंडेल नाबाद 2 (6 चेंडू). एकूण 1.4 षटकात बिनबाद 9.
गोलंदाजी
इशांत शर्मा 1-0-8-0, जसप्रित बुमराह 0.4-0-1-0.
आम्ही न्यूझीलंडविरुद्ध सर्व आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरलो, हे मान्य करावेच लागेल. पण, या केवळ एकाच पराभवावर संघ वाईट ठरत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे मी सांगू इच्छितो.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-3 असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आम्ही येथे भारताविरुद्ध रणनीती काटेकोर अंमलात आणत विजय संपादन केला. पण, याला आम्ही मुसंडी मारणे असे वगैरे काही मानत नाही.
-न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन