केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड, विराट कोहलीला विश्रांती, हार्दिक पंडय़ाला डच्चू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आघाडीचा अव्वल फलंदाज रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा नवा टी-20 कर्णधार असेल, यावर मंगळवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱया 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली गेली असून विराट कोहलीला यातून विश्रांती देण्यात आली. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिली टी-20 दि. 17 नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये खेळवली जाईल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा ऋतुराज गायकवाड, सर्वाधिक बळी घेणारा हर्षल पटेल यांच्यासह अष्टपैलू वेंकटेश अय्यरला या मालिकेसाठी जाहीर 16 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराजने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंडय़ाला संघातून डच्चू मिळाला. हार्दिक पंडय़ाला यापूर्वी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर त्याला संघातील जागा गमवावी लागेल, हे साहजिक होते.
यजुवेंद्र चहलचेही पुनरागमन
यापूर्वी, आयसीसी टी-20 विश्वचषक संघातून आश्चर्यकारकरित्या डच्चू दिल्या गेलेल्या यजुवेंद्र चहलचे या मालिकेसाठी पुनरागमन झाले. जलद गोलंदाज मोहम्मद सिराज देखील संघात परतला. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर हे टी-20 विश्वचषक संघातील राखीव खेळाडू आता मुख्य संघात समाविष्ट केले गेले आहेत. रोहितची कर्णधारपदी नियुक्ती ही औपचारिकता होती आणि आता या क्रिकेट प्रकारात केएल राहुल उपकर्णधार असेल. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, फिरकीपटू रविंद्र जडेजा यांना या छोटेखानी मालिकेतून विश्रांती देण्यात आली.
भारतीय टी-20 संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
भारत-न्यूझीलंड टी-20 मालिका
तारीख / सामना / ठिकाण
17 नोव्हेंबर / पहिली टी-20 / जयपूर
19 नोव्हेंबर / दुसरी टी-20 / रांची
21 नोव्हेंबर / तिसरी टी-20 / कोलकाता









