पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या पक्षाची स्थिती मजबूत : नॅशनल पार्टीचे आव्हान
वृत्तसंस्था / ऑकलंड
न्यूझीलंडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी देशात कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या न्यूझीलंड लेबर पार्टीला या निवडणुकीत विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. जेसिंडा यांची मंगळवारी अंतिम प्रचारसभा पार पडली आहे. सुमारे हजार विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. या सभेत जेसिंडा आणि त्यांचे समर्थक मास्कशिवाय दिसून आले आहेत.
जेसिंडा यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत सेल्फीही काढून घेतल्या आहेत. जगातील अन्य कुठल्याही देशात एखादा नेता समर्थकांसोबत मास्कशिवाय दिसून आला, सेल्फीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यास वाद निर्माण होईल. परंतु न्यूझीलंडमध्ये संसर्ग कमी झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत.
मतदानपूर्व सर्वेक्षणात आघाडीवर
देशात झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये जेसिंडा यांचा पक्ष विरोधकांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. देशाच्या संसदीय निवडणुकीत जेसिंडा यांच्या लेबर पार्टीसह आणखी 4 पक्षाचे उमेदवार उभे आहेत. यात ऍक्ट पार्टी, ग्रीन पार्टी, नॅशनल पार्टी आणि न्यूझीलंड फर्स्ट पार्टी सामील आहे. परंतु मुख्य लढत लेबर पार्टी आणि नॅशनल पार्टी यांच्यातच राहणार आहे. नॅशनल पार्टीने जेसिंडा यांच्या विरोधात जुडित कॉलिन्स यांचे नेतृत्व उभे केले आहे. जुडित 4 वेळा खासदार राहिल्या आहेत. देशाचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
महामारीचा मुद्दा
जुडित यांच्यासोबत 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादविवाद कार्यक्रमात जेसिंडा यांनी महामारीचा मुद्दा उपस्थित केला होता. न्यूझीलंडला सुरक्षित ठेवणे आणि बाधितांच्या रिकव्हरीला वेग देण्यात कोण उत्तम आहे असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले होते. तर जुडित यांनी मुलांमधील गरीबी दूर करणे आणि किफायतशील गृह प्रकल्पांचे आश्वासन पूर्ण न केल्याप्रकरणी जेसिंडा यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ऑकलंडमध्ये पुन्हा संक्रमण फैलावल्याचा मुद्दाही जुडित यांनी उपस्थित केला होता.
30.4 लाख मतदार
देशात सुमारे 30.4 लाख मतदार आहेत. अर्ली वोटिंग 3 ऑक्टोबर रोजी सुरू झाले आहे. न्यूझीलंडच्या इलेक्टोरल कमिशननुसार 11 ऑक्टोबरपर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी अर्ली वोटिंग केले आहे. अर्ली वोटिंगसाठी कमिशनकडून खबरदारी बाळगली जात आहे. मतदारांसाठी केंद्रांवर हँड सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या स्वाक्षरीसाठी 20 लाख डिस्पोजेबल पेन खरेदी करण्यात आले आहेत.
महामारीवर नियंत्रणास यश
जेसिंडा यांच्या सरकारने महामारी रोखण्याप्रकरणी चांगले काम केले आहे. 50 लाखांची लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोनामुळे केवळ 25 जणांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यातच न्यूझीलंडने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा पहिल्यांदा दावा केला होता. परंतु सप्टेंबरमध्ये ऑकलंडमध्ये नवे रुग्ण सापडले होते. यानंतर ऑकलंडमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली. चालू आठवडय़ात ऑकलंडमधील सर्व रुग्ण बरे झाल्यावर देशाला कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.









