सनसनाटी विजयासह न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक
अबु धाबी / वृत्तसंस्था
डॅरेल मिशेल (47 चेंडूत नाबाद 72), डेव्हॉन कॉनव्हे (38 चेंडूत 46) व जेम्स नीशमच्या (11 चेंडूत 27) यांच्या विस्फोटक फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अतिशय सनसनाटी विजय नोंदवत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. इंग्लंडने 20 षटकात 4 बाद 166 धावांचा डोंगर रचल्यानंतर न्यूझीलंडने या त्रिकुटाच्या चौफेर फटकेबाजीमुळे 19 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयासह न्यूझीलंडने 2019 वनडे वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचाही चांगलाच वचपा काढला.
न्यूझीलंडचा सलामीवीर मिशेलने शेवटपर्यंत नाबाद राहत आक्रमक फटकेबाजी केली तर त्याला नीशम व कॉनव्हे यांचीही अगदी समयोचित साथ लाभली. फटकेबाजी करणारा नीशम अदिल रशिदच्या 18 व्या षटकात कव्हरमधील मॉर्गनकडे झेल देत बाद झाला, त्यावेळी इंग्लंडच्या आशाअपेक्षा उंचावल्या. पण, मिशेलने ख्रिस वोक्सला आणखी 2 षटकार व चौकार फटकावत त्यांची उरलीसुरली अपेक्षाही संपुष्टात आली.
मोईन अलीची खेळी व्यर्थ
तत्पूर्वी, अष्टपैलू मोईन अलीच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने 4 बाद 166 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मोईन व डेव्हिड मलान (30 चेंडूत 41) यांनीच 2019 वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये देखील मोलाचे योगदान दिले होते.
मोईनने येथील लढतीत 3 चौकार व 2 षटकार तर मलानने 4 चौकार व 1 षटकार फटकावला. पहिल्या तीन षटकात सावध फलंदाजीवर भर दिल्यानंतर सलामीवीर जोस बटलरने (29) ट्रेंट बोल्टला सलग दोन चौकारासाठी पिटाळून लावले. यातील पहिला चौकार स्ट्रेट डाऊन तर दुसरा चौकार कव्हरच्या दिशेने होता. जेसॉन रॉयच्या गैरहजेरीत जॉनी बेअरस्टोने (13) लक्षवेधी फटके मारले. इंग्लंडने यामुळे 5 षटकात बिनबाद 37 अशी सावध सुरुवात केली होती.

न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनने गोलंदाजीत बदल केल्यानंतर ब्रेकथ्रू मिळवून देण्यात ही चाल उत्तम फळली. ऍडम मिल्नेच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टो झेलबाद झाला. स्वतः कर्णधार विल्यम्सनेच मिडऑफवर डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. मिल्नेच्या या यशामुळे किवीजना आवश्यक ब्रेकथू तर मिळालाच. शिवाय, धावगती आटोक्यात आणता आली. इंग्लंडच्या खात्यावर पॉवर प्लेअखेर 1 बाद 40 धावांची नोंद झाली.
लेगस्पिनर ईश सोधीने पहिल्या षटकात 5 धावा देत समयोचित सुरुवात केली. बटलरने मिशेल सॅन्टनरला रिव्हर्स स्वीपचा चौकार खेचत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बटलरचा सोधीला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि तो पायचीत होत तंबूत परतला. इंग्लंडला 11 व्या षटकात 2 चौकारांसह 11 धावा जमवता आल्या. ग्लेन फिलीप्सच्या या षटकात मलानने 2 चौकार वसूल केले होते. लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत जलद 17 धावा केल्या. मलान बाद झाल्यानंतर मोईन अलीने सर्व सूत्रे हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली आणि त्याची अर्धशतकी खेळी, हेच इंग्लंडच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.
धावफलक
इंग्लंड ः जोस बटलर पायचीत गो. सोधी 29 (24 चेंडूत 4 चौकार), जॉनी बेअरस्टो झे. विल्यम्सन, गो. मिल्ने 13 (17 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड मलान झे. कॉनव्हे, गो. साऊदी 41 (30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मोईन अली नाबाद 51 (37 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), लियाम लिव्हिंगस्टोन झे. सॅन्टनर, गो. नीशम 17 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), इयॉन मॉर्गन नाबाद 4 (2 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 4 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम
1-37 (बेअरस्टो, 5.1), 2-53 (बटलर, 8.1), 3-116 (मलान, 15.2), 4-156 (लिव्हिंगस्टोन, 19.2).
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-24-1, ट्रेंट बोल्ट 4-0-40-0, ऍडम मिल्ने 4-0-31-1, ईश सोधी 4-0-32-1, मिशेल सॅन्टनर 1-0-8-0, जेम्स नीशम 2-0-18-1, ग्लेन फिलीप्स 1-0-11-0.
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टील झे. अली, गो. वोक्स 4 (3 चेंडूत 1 चौकार), डॅरेल मिशेल नाबाद 72 (47 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), केन विल्यम्सन झे. रशिद, गो. वोक्स 5 (11 चेंडू), डेव्हॉन कॉनव्हे यष्टीचीत बटलर, गो. लिव्हिंगस्टोन 46 (38 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), ग्लेन फिलीप्स झे. बिलिंग्ज, गो. लिव्हिंगस्टोन 2 (4 चेंडू), जेम्स नीशम झे. मॉर्गन, गो. रशिद 27 (11 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), मिशेल सॅन्टनर नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 10. एकूण 19 षटकात 5 बाद 167.
गडी बाद होण्याचा क्रम
1-4 (गप्टील, 0.3), 2-13 (विल्यम्सन, 2.4), 3-95 (कॉनव्हे, 13.4), 4-107 (फिलीप्स, 15.1), 5-147 (नीशम, 17.6).
गोलंदाजी
ख्रिस वोक्स 4-1-36-2, ख्रिस जॉर्डन 3-0-31-0, अदिल रशिद 4-0-39-1, मार्क वूड 4-0-34-0, लियाम लिव्हिंगस्टोन 4-0-22-2.
गप्टील, विल्यम्सन लवकर परतले, तरीही….
विजयासाठी 167 धावांच्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची मुख्य भिस्त मार्टिन गप्टील व केन विल्यम्सन यांच्यावरच होती. पण, नेमके हेच दोघेही फलंदाज अवघ्या 9 धावांच्या अंतरात बाद झाले आणि न्यूझीलंडच्या डावाला मोठा सुरुंग लागला. इंग्लंडच्या संघसहकाऱयांनी सामना जिंकल्याच्या थाटात या दोन बळींचा आनंद साजरा केला. पण, नंतर मिशेल, कॉनव्हे, नीशम यांचे इरादे वेगळेच होते, ते त्यांनी साध्य करेतोवर इंग्लिश संघ हतबलच राहिला. याचीच परिणती इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यात झाली!
गगनाशी स्पर्धा करणारे ‘ते’ 8 षटकार आणि इंग्लिश स्वप्नांचा चक्काचूर!
167 धावांचे आव्हान असताना डॅरेल मिशेलने 47 चेंडूत नाबाद 72 तर डेव्हॉन कॉनव्हेने 38 चेंडूत 46 धावांची भागीदारी साकारत विजय खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. आपल्या डावात मिशेल, नीशम व कॉनव्हे यांनी एकापेक्षा एक अशा गगनचुंबी फटक्यांची आतषबाजी केली. मिशेलने 4, नीशमने 3 तर कॉनव्हेने 1 असे गगनाशी स्पर्धा करणारे 8 उत्तुंग षटकार खेचले आणि या 8 अस्मानी षटकारांमुळेच इंग्लंडचा फायनलमध्ये धडक मारण्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला!
इंग्लंडची व्यथा….पहिल्या 15 षटकात कमावले आणि शेवटच्या 4 षटकात गमावले!
ग्लेन फिलीप्स चौथ्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंडची 15.1 षटकात 4 बाद 107 अशी स्थिती होती आणि उर्वरित 4.1 षटकात 60 धावांची आवश्यकता, असे समीकरण होते. इंग्लडच्या विजयाची शक्यता 79 टक्के तर न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता 21 टक्के, असे टीव्हीवरील सर्वेक्षण सांगत होते. पण, प्रत्यक्षात मिशेल, कॉनव्हे व नीशम यांच्या फटकेबाजीने सारे चित्र अवघ्या 3.1 षटकातच पालटले आणि न्यूझीलंडने 6 चेंडूंचा खेळ बाकी राखत एकतर्फी विजय संपादन केला. इंग्लंडने पहिल्या 15 षटकात जे कमावले होते, ते सारे काही पुढील 4 षटकातच गमावल्याचे या निकालाने स्पष्ट झाले.
जॉर्डनचे 23 धावांचे ते महागडे षटक आणि सामन्याचे चित्रच पालटले!
न्यूझीलंडला विजयासाठी 24 चेंडूत 57 धावांची आवश्यकता असताना नीशमने ख्रिस जॉर्डनला 2 षटकार व 1 चौकारासाठी फटकावले आणि या षटकात 23 धावा वसूल झाल्या. याच एका षटकामुळे पूर्ण सामन्याचे चित्र पालटले. या षटकानंतर 24 चेंडूत 57 धावांचे समीकरण थेट 18 चेंडूत 34 धावांवर आले आणि त्यानंतर न्यूझीलंडने एका षटकाचा खेळ बाकी राखत धडाकेबाज विजय संपादन केला.









