वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचे वास्तव्य सध्या मालदीवमध्ये असून ते ब्रिटनला मालदीव येथून प्रयाण करण्याची शक्यता असल्याची माहिती या संघाचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
कोरोना महामारीमुळे भारतातील 2021 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीत लांबणीवर टाकल्यानंतर ब्रिटनला जाणाऱया न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटपटूंनी मालदीवमध्ये आपले वास्तव्य केले असून या संपूर्ण क्रिकेटपटूंचा गट सध्या मालदीव येथे क्वारंटाईनमध्ये असल्याचे स्टीड यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये गेल्यानंतर न्यूझीलंडच्या या क्रिकेटपटूंना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल याबाबत मात्र स्टीड यांनी ठाम मत व्यक्त केलेले नाही. मालदीवमध्ये सध्या क्वारंटाईन असणाऱया न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार केन विलीयमसन, सँटनर, जेमिसन आणि फिजिओ सिमसेक यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू 15, 16 किंवा 17 मे रोजी मालदीव येथून ब्रिटनकडे प्रयाण करतील, असा अंदाज आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 जूनपासून खेळविली जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील अंतिम लढत भारताबरोबर खेळणार आहे. इंग्लंड बरोबरच्या पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाज बोल्ट खेळण्याची शक्यता कमी आहे.









