वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रुस टेलर यांचे शनिवारी वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. कसोटी पदार्पणात एका डावात शतक आणि पाच बळी घेणारे ब्रुस टेलर हे कसोटी क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहेत.
1965 साली भारताच्या दौऱयावर आलेल्या न्यूझीलंड संघामध्ये ब्रुस टेलर यांचा समावेश होता. टेलर यांनी केवळ तीन प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 1965 सालातील भारताच्या दौऱयात न्यूझीलंड संघामध्ये पहिल्या सामन्यासाठी टेलर यांची अंतिम 11 खेळाडूंत निवड झाली नव्हते. पण कोलकाताच्या दुसऱया कसोटीत त्यांचा संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना डावखुऱया टेलर यांनी 105 धावा झळकविताना सटक्लिफसमवेत 163 धावांची भागिदारी केली होती. सटक्लिफने नाबाद 151 धावा जमविल्या होत्या. या सामन्यात ब्रुस टेलर यांनी 86 धावांत 5 गडी बाद केले होते. टेलर यांचा हा कसोटीतील पहिला सामना होता. टेलर यांनी या दौऱयातील पुढील कसोटीत अणखी पाच गडी बाद पेले होते. 1969 साली बलाढय़ विंडीज संघाविरूद्ध कसोटीमध्ये टेलर यांनी 83 चेंडूत जलद शतक झळकविले होते. टेलर यांचा हा विक्रम 36 वर्षे अबाधित राहिला होता. टेलर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 26.6 धावांच्या सरासरीने 30 सामन्यात 111 बळी घेतले आहेत. क्रिकेट न्यूझीलंडतर्फे टेलर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









