वृत्तसंस्था/ रावळपिंडी
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या पाकमध्ये वन-डे मालिका खेळण्यासाठी दाखल झाला होता. या मालिकेतील पहिला सामना खेळविला जाण्यापूर्वी न्यूझीलंड संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे.
शुक्रवारी रावळपिंडीच्या स्टेडियमवर उभय संघातील पहिला वन-डे सामना खेळविला जाणार होता. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंचे वास्तव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये होते. दरम्यान, स्टेडियमच्या परिसरात सामना सुरू होण्यापूर्वी अचानक गोंधळ शौकिनांनी केला. परिस्थितीचा अंदाज घेत न्यूझीलंड संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रमुख कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी सदर दौरा रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. न्यूझीलंड शासनाकडून सदर दौरा तातडीने रद्द करण्याचा सल्ला क्रिकेट मंडळाला देण्यात आल्याने आम्हाला हा दौरा रद्द करावा लागत असल्याचे व्हाईट यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. पाहुण्या संघातील खेळाडूंना सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही काळजी करण्याची गरज नसून पाककडे जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना उपलब्ध असल्याचे पाकच्या पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, हा दौरा रद्द करण्याचा हा निर्णय एकतर्फी असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. तब्बल 18 वर्षानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच पाकच्या दौऱयावर आला होता. या दौऱयामध्ये तीन वन-डे आणि पाच टी-20 सामने आयोजित केले गेले होते. क्रिकेटपेक्षा खेळाडूंच्या वैयक्तिक सुरक्षेला पहिले प्राधान्य देत असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटपटू संघटनेचे प्रमुख कार्यकारी मिल्स यांनी म्हटले आहे.
2009 साली लंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकमध्ये कोणत्याही विदेशी संघ मालिका खेळण्यासाठी राजी झाले नाहीत. चालू वर्षाच्या अखेरीस इंग्लंड आणि विंडीजचे संघ पाकच्या दौऱयावर येणार आहेत. आता या घटनेमुळे त्या दौऱयावर देखील अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.









