वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयाच्या आवारात नेहमीच पार्किंगची समस्या उद्भवत असते. पार्किंगवरून बऱयाचवेळा वाद होत असतात. विशेषकरून जेएमएफसी न्यायालयात मोठी गर्दी होत असते. मात्र, त्या ठिकाणी अजूनही पार्किंगला शिस्त लावण्यात आली नव्हती. मात्र, आता पार्किंगला शिस्त लावण्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. त्यामुळे वकीलवर्गातून तसेच पक्षकारांतून समाधान व्यक्त होत आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीमध्ये अनेक न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. जेएमएफसीबरोबरच कौटुंबिक आणि जिल्हा न्यायालयेही आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. यातच काही ठिकाणी नवीन इमारती उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे जागा कमी पडत आहे. जागा नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक बेशिस्तपणे पार्किंग करत आहेत. बऱयाचवेळा वादही होत आहेत. त्यामुळे बार असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत सूचना करून मार्किंग केले आहे.
वाहनचालकांनी आता मार्किंगप्रमाणेच वाहने पार्किंग करावीत, असे सांगण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे वाहनांची संख्या कमी आहे. मात्र, आता न्यायालय सुरू झाल्यामुळे वाहनसंख्या वाढणार आहे. त्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे.









