निपाणीत बाजार कर वसुली थांबली : रस्त्यावर अतिक्रमण वाढले
प्रतिनिधी / निपाणी
शहर व उपनगरातील रस्त्यावरच्या बाजाराला शिस्त लावण्यासाठी अनावश्यक अतिक्रमण तत्काळ हटविता यावे तसेच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी आदी उद्देशाने निपाणी पालिकेतर्फे दोन वर्षापूर्वी बाजार कर आकारणीची सुरुवात झाली. मात्र लॉकडाऊननंतर बाजार कर आकारणी थांबली आहे. ठेकेदारांमधील वादाचा परिणाम म्हणून पालिका प्रशासनाला बाजार करावर पाणी फिरवावे लागले आहे.
निपाणी ही सीमावर्ती प्रमुख बाजारपेठ असल्याने आसपासच्या सुमारे 50 खेडेगावातील लोकांचा दररोज निपाणीशी संपर्क येतो. यातून निपाणीत दैनंदिन कोटय़वधींची उलाढाल होते. अशावेळी याचा पालिकेला फायदा व्हावा या उद्देशाने दोन वर्षापूर्वी बाजार कर सुरू करण्यात आला. त्यानुसार ठेकेदारी पद्धतीने हा कर वसूल करण्याचे ठरवून प्रत्येक वर्षी हा ठेका लिलाव पद्धतीने देण्यात आला.
मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे कर वसुली ठप्प झाली. अशातच कराचा वार्षिक ठेका संपल्याने नव्याने लिलाव घेण्यात आला. मात्र यापूर्वीच्या ठेकेदाराने लॉकडाऊन काळात बाजारकर वसुली थांबल्याने नुकसान झाल्याचे सांगत ठेक्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली.
अतिक्रमणावर बाजार कर योग्य पर्याय
निपाणीचा वाढता विस्तार लक्षात घेत अनेक दुकानदारांनी आपला माल रस्त्यावर थाटून मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. मात्र बाजार कर ठेकेदारांकडून पालिकेच्या रस्त्यावर ठेवण्यात येणाऱया व्यापारी वस्तूंवर लावला जातो. त्यामुळे रस्त्यावर दुकानदाराने आपले साहित्य ठेवल्यास त्याच्याकडून ठेकेदार कर वसूल करायचा. त्यामुळे दुकानदारांनी आपला माल दुकानातच ठेवण्यास पसंती दिल्याने रस्ते मोकळे श्वास घेत होते. त्यामुळे बाजार कर हा अतिक्रमण नियंत्रण करण्यासाठी एक चांगला पर्याय असल्याची चर्चा आहे.