मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा ईडीने समन्स बजावले आहेत. मात्र, पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ईडी आता अनिल देशमुख यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने याबाबतची कारवाई करण्याआधीच अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली आहे.
माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे.
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (18 ऑगस्ट) हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.