प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यादृष्टिने आम्ही प्रयत्न करतच आहोत. मात्र आता न्यायालयाबाहेरही हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करतो, अशी ग्वाही महाराष्ट्राचे खासदार संजय राऊत यांनी शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी हॉटेल मॅरिएट येथे संजय राऊत यांची म. ए. समितीच्या शिष्टमंडळातील नेताजी जाधव, अनंतराव जांगळे, विजय जाधव यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील ग्वाही दिली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र सरकारने 14 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी दावा दाखल केला आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय झाला नाही. हा खटला तीन खंडपीठासमोर सुरू असल्याने कधी यामधील न्यायाधीश कर्नाटकाचे तर कधी महाराष्ट्राचे असतात. त्यामुळे हा खटला लांबणीवर पडत आहे. मात्र यापुढे आम्ही आपल्यापरीने प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
महाजन अहवाल गाडला गेलेला असताना आजही कर्नाटकातील सर्वपक्षीय नेते महाजन अहलावाप्रमाणेच हा प्रश्न सुटावा, अशी हास्यास्पद मागणी करत असतात. या अहवालाची चिरफाड करून इतर खासदारांनाही सीमाभागावर असा अन्याय झाला आहे याची माहिती करून द्यावी, अशी विनंती केली असता यावर राऊत यांनी यामध्ये मी जातीने लक्ष घालू आणि हा प्रश्न लोकसभेत मांडू आणि सोडवणुकीसाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे..









