पक्षकारांतून तीव्र नाराजी : समस्या सुटून न्याय कधी मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
न्यायालयाची पायरी चढताना सारे जण घाबरतातच. तरी देखील अन्याय दूर करण्यासाठी व कायद्याने न्याय मिळविण्यासाठी सर्वसामान्य जनतेला न्यायालयाची पायरी चढावीच लागते. कोरोनामुळे मात्र आणखीनच समस्या जटिल झाली असून न्यायासाठी भर रस्त्यावर उन्हात ताटकळत थांबवे लागत आहे. त्यामुळे पक्षकारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने अधिक महसूल मिळणारे सर्व विभाग सुरू केले आहेत. याचबरोबर आता महाविद्यालयेही सुरू केली आहेत. मात्र न्यायालये सुरू झाली नाहीत. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक न्यायालय ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. अन्याय झाल्यानंतर त्या विरोधात न्याय मागण्यासाठी जनता न्यायालयात जाते. मात्र न्यायालय सुरू करण्यात आली नसल्यामुळे साऱयांनाच अन्याय सहन करावा लागत आहे.
रॅपिड टेस्ट करूनच पक्षकारांनी आत यावे, अशी अट लादण्यात आली. त्यामुळे पक्षकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोठमोठे अधिकारी तसेच महाविद्यालये सुरू झाली असताना न्यायालयेच का सुरू करण्यात आली नाहीत, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे. वकिलांना कोरोना चाचणीची सक्ती लादण्यात आली नाही. मात्र पक्षकारांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. एकाला एक न्याय तर दुसऱयाला एक हे योग्य आहे का, आता हेच न्यायालयांनी स्पष्ट करावे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.









