> न्यायाधीशांवरील आरोपप्रकरणी शिक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन न्यायाधीशांवर निराधार आरोप केल्याप्रकरणी तिघांना तीन महिन्यांच्या कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रूपयांची दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली आहे. हा प्रकार म्हणजे न्यायव्यवस्थेची कोंडी करण्याचा
प्रयत्न होता, असेही निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, संपूर्ण देशात कोराना विषाणू संसर्गाच्या प्रसार सुरू असल्याने या शिक्षेची अंमलबजावणी 16 आठवडय़ानंतर होईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान, मागील वर्षी 27 मार्च रोजी वकील मैथ्यूज नेदुम्परा यांना न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यांना विनाअट माफी मागितल्याने त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली होती.
महाराष्ट्र आणि गोवा इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुर्ले, इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश ओझा आणि अशासकीय संस्था हय़ुमन राइट सेक्युरिटी कौन्सिलचे राष्ट्रीय सचिव राशिद खान पठाण यांना न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश अनिरूद्ध बोस यांच्या खंडपीठाने चार मे रोजी शिक्षा सुनावली. सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर केलेले सर्व आरोप हे निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आरोप केल्याबाबत पश्चातापही झालेला नाही. त्यांनी माफी मागण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांना विनाशिक्षा सुटका करणे चुकीचे ठरेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.









