प्रतिनिधी/सातारा
सातारच्या तहसिलदार कार्यालय परिसरात नो पार्किंग झोन असूनही वाहनधारक नियम मोडीत काढत आहेत. यामुळे मंगळवारी सकाळच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही कोंडी सोडवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली.
वाहतूक कोंडी ही शहरापुर्ती मर्यादित राहलेली नाही. शासकीय कार्यालयातही वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तहसिलदार कार्यालय परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयात येणाऱया दुचाकी, चारचाकी वाहनांना नियम लावणे गरजेचे झाले होते. यामुळे संबंधित प्रशासनाने परिसरात नो पार्किंग झोन घोषित केला. जेष्ठ मंडळी, दिव्यांग यांच्या वाहनांना प्रवेशास परवानगी होती. मात्र सुरूवातीच्या काही दिवस सर्व नियम पाळण्यात आले. तोच कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. या लॉकडाऊनमध्ये सर्वच कार्यालये ओस पडली होती. लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा कार्यालये गजबजली आहेत. तहसिलदार कार्यालयातही मंगळवारी सलग सुट्टयामुळे प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. नो पार्किग झोन असतानाही सर्वच वाहनांचे पार्किंग कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते. यामुळे प्रवेशद्वारात कोंडी होवून वाहने अडकून पडली होती. अर्धातास वाहनधारकांना कसरत करावी लागली. यामुळे पार्किगचे सर्व नियम मोडीत निघाल्याची चर्चा कार्यालयात सूरू होती.








