दररोजच्या वाहतूक कोंडी समस्येमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली : रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही रस्त्यांवर नो एंट्री
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रहदारी खात्याकडून नो एंट्री आणि नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत. विशेषतः गणपत गल्ली ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने नरगुंदकर भावे चौकामधून खडेबाजारकडे येण्यास वाहनांवर बंदी आहे. मात्र या नो एंट्रीमधून ये-जा करणाऱया वाहनांमुळे गणपत गल्लीत वाहतूक केंडीची समस्या निर्माण होत आहे.
शहर आणि उपनगरातील काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः बाजारपेठेतील काही रस्ते अरुंद असल्याने वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. गणपत गल्ली ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर वाहनांची आणि पादचाऱयांची गर्दी नेहमी असते. अशातच रस्त्याशेजारी भाजी-फळ विपेते तसेच अन्य व्यावसायिक व्यवसाय करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करण्यात येत असल्याने अडचणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक तासन्तास अडकून पडतात. त्यामुळे रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचे प्रकार टाळण्यासाठी काही रस्त्यांवर नो एंट्री करण्यात आली आहे.
बाजारपेठेत गणपत गल्लीचा रस्ता महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावर नरगुंदकर भावे चौकामधून काकतीवेसकडे जाण्यास वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र चौकामधून हुतात्मा चौकाकडे जाण्यास रामदेव गल्लीच्या रस्त्यावर प्रवेशबंदी आहे. पिंपळकट्टा चौकामधून नरगुंदकर भावे चौकाकडे येण्यास कलमठ रोडवर वाहनांना प्रवेशबंदी आहे. तसेच हुतात्मा चौकामधून धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणाऱया किर्लोस्कर रोडवर प्रवेशबंदी आहे. प्रवेशबंदीबाबतचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पण दुचाकी आणि काहीवेळा चारचाकी वाहने तसेच प्रवासी रिक्षा नो एंट्री असलेल्या रस्त्यावरून जात असल्याचे सर्रास निदर्शनास येत आहे. रामदेव गल्ली अरुंद असून या रस्त्यावर मोठमोठी व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी गर्दी असते. पण या रस्त्यावर नो एंट्रीमधून वाहने जात असल्याने कोंडी निर्माण होत आहे.
तसेच नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत. रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पण या रस्त्यावर दोन्ही बाजूनी दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.
रहदारी पोलिसांची नियुक्ती गरजेची
एरव्ही विविध चौक, बाजारपेठ आणि वाहतूक कोंडी होणाऱया रस्त्यावर रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात येत होती. पण आता केवळ मुख्य चौकात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. तसेच विविध ठिकाणी आडमार्गावर थांबून विनाहेल्मेट वाहनधारक आणि परराज्यातील चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी चार ते पाच पोलीस थांबलेले असतात. पण वाहतूक कोंडी होणाऱया ठिकाणी एकही रहदारी पोलीस नसतो. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक केंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येचे निवारण करण्यासाठी नो पार्किंग आणि नो एंट्री नियमावलीचे पालन करण्याची गरज असल्याने याकडे रहदारी पोलीस लक्ष देतील का? अशी विचारणा व्यावसायिक, रहिवासी आणि पादचारी उपस्थित करीत आहेत.









