ऑनलाईन टीम / चंदीगड :
चंदीगडमध्ये आरबीआयच्या नोटांनी भरलेले तीन ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. यामध्य दोन ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून, दोन पोलीस जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या नोटांनी भरलेले पाच ट्रक चंदीगड रेल्वे स्टेशनवरून सेक्टर-17 मध्ये असलेल्या आरबीआयच्या कार्यालयाकडे जात होते. नोटांच्या या ताफ्याला मागे आणि पुढे तसेच ट्रकमध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दरम्यान, सेक्टर 26 मध्ये पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक लावल्याने एका रांगेत असलेल्या पहिल्या व दुसऱ्या ट्रकला ब्रेक लावावे लागले. परंतू, तिसऱ्या ट्रक चालकाच्या हा प्रकार लक्षात न आल्याने त्याचा ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्याच वेगात असलेला चौथा ट्रक तिसऱ्या ट्रकला तर चौथा ट्रक पाचव्या ट्रकला धडकला.
या अपघातात तिसऱया आणि चौथ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. दरम्यान, या ट्रकमध्ये संरक्षणासाठी असलेली महिला पोलीस अडकली होती. एक तासाच्या प्रयत्नानंतर ट्रकची केबिन कापून महिला पोलिसाला बाहेर काढण्यात आले. यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले. तर एक पोलीस कर्मचारी या अपघातात गंभीर जखमी झाला.









