प्रतिनिधी/ पणजी
पणजी महापालिकेतील नोकरीतून कमी करण्यात आलेल्या 20 कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केली असून तो विषय मनपा बैठकीत चर्चेचा ठरला. तो निर्णय त्वरित रद्द करावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान विविध करांपोटी रु. 37 कोटी थकबाकी मनपाला येणे असून त्या महसुलाची मूळ रक्कम रु. 16 कोटी आहे. ती वाढवून आता रु. 37 कोटीपर्यंत पोहोचली अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली आहे. तसेच सोमवार दि. 5 जुलै पासून पणजी मार्केटातील गाळेधारकांसोबत भाडे करार करण्याचे ठरवण्यात आले आहे. जे करार करणार नाहीत त्यांना नोटीसा पाठवण्यात येणार असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर भरणा करण्यासाठी एक खर्ची तडजोड योजना लागू करण्याचे पणजी मनपाने ठरवले असून त्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तसेच व्यापार परवाना नूतनीकरणासाठी देखील तीच मुदत देण्यात आल्याचे ते म्हणाले. पणजी शहरातील दोन रस्ते स्मार्ट करण्यासाठी व सांतईनेज .. नूतनीकरण प्रस्तावास मनपा बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाच्या बैठकीत पणजी शहराला 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी दोन जलसाठी बांधण्याचे, पाटो पणजी येथे फुटब्रीज उभारण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले.
दरम्यान पणजी महापालिकेत 11 एलडीसी पदे भरण्यास बेत आखण्यात आला असून आमदार बाबूश मोन्सेरात यांचे उमेदवार तेथे चिकटवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









