तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कृषी खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघा जणांना मिळून सुमारे ६ लाखाला गंडविले असल्याची फिर्याद शिवाजी रामदास भोंग रा. लऊळ ता. माढा यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी भोंग यांचा मुलगा ज्ञानेश्वर याचे बी.ए. बीएड् शिक्षण पूर्ण झाले असून तो नोकरीच्या शोधात होता. परंतू नोकरी काही मिळत नव्हती. दरम्यान भोंग यांच्या शेजारी राहणारे संध्या पाठक यांच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी पाठक यांच्या घरी त्यांच्या ओळखीचे मोहन दामोदर कुलकर्णी (अंदाजे वय ५०, मुळ रा. प्लॉट नंबर ३०६, मांजरी रोड, गणेश मंदिराजवळ घुले वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे, सध्या रा. प्लॉट नं.४ डी. आय राजयोग सोसायटी, वडगाव खुर्द, धायरी, पुणे) हे येत होते. मोहन कुलकर्णी यांनी फिर्यादी भोंग व संध्या पाठक यांना असे सांगितले की, माझ्या महाराष्ट्रात विविध सरकारी खात्यात अनेक ओळखी आहेत. अनेकांना मी नोकरीला लावले आहे. आता कृषी खात्यात क्लार्क पदाच्या जागा आहेत. कोणाला नोकरीला लावायचे असल्यास मला सांगा मी लावतो, असे म्हणून विश्वास संपादन केला. फिर्यादीला मुलाला नोकरी लावायची असल्याने त्याने कुलकर्णी यांच्या बोलणी करुन ३ लाख रोख व ९९ हजार रुपये अकाऊंटला ट्रान्सफर केले. तीन महिन्यात नोकरी नाही लागली तर पैसे परत करतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर मुलाच्या नियुक्ती पत्राबाबत विचारले असता आता सर्व पदे भरली आहेत. क्लार्कची जागा पुन्हा रिकामी झाली की सांगेन, असे सांगून वेळकाढूपणा केला. प्रत्येक वेळी खोटी कारणे देत आहे हे लक्षात आल्यावर फिर्यादीने पैसे परत मागितले असता कुलकर्णी यांनी फिर्यादीला चेक दिला. पण तो अपुऱ्या रकमेमुळे वटला नाही. फिर्यादीला फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संध्या पाठक, मोहन भोंग यांच्या मदतीने कुर्डुवाडी येथे बोलावून घेऊन त्यास पोलिस ठाण्यात आणले. फिर्यादी भोंग यांच्याप्रमाणे संध्या पाठक व मोहन भोंग यांच्याकडूनही कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ लाख रुपये घेतले आहेत. तिघा जणांची मिळून एकूण ५ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याच्या भोंग यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत मोहन कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.