शाहूपुरी पोलिसांची कारवाई : 44 हजारांना घातला होता गंडा
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील बुधवार पेठेतील एकास नोकरीचे तसेच ब्लिचिंग पावडरचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखव त्याला 44 हजार 200 रुपयांना गंडा घालणाऱया तोसिफ दस्तगीर शेख रा. सरताळे, ता. जावली यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अमिन शेख, रा. बुधवार पेठ, सातारा यांनी उपविभागीय पोलीस कार्यालयात सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, मी जिल्हाधिकारी कार्यालयात कामास असून तुमच्या पत्नीस नोकरीस लावतो तसेच तुम्हाला ब्लिचींग पाऊडरचे टेंडर मिळवून देतो असे अमिष दाखवत तोसिफ शेख याने अमिन शेख यांच्याकडून 44 हजार 200 रुपये घेतले होते. मात्र, तोसिफ शेख याने अमिन शेख यांच्या पत्नीस नोकरीस न लावता व टेंडर मिळवून न देता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना केले. मात्र, तोसिफ शेख त्याच्या मूळ गावी सरताळे येथे रहात नव्हता. मग शाहूपुरी पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता तो कुडाळ येथे असल्याचे समजले. त्यानुसार कुडाळ येथे सापळा रचून तोसिफ शेख याला ताब्यात घेतले.
त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, तोसिफ शेख याने अशाच प्रकारे इतर लोकांची देखील फसवणूक केली असल्याची दाट शक्यता असून नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार आशिष कुमठेकर करत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व संदीप शितोळे, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने कॉन्टेबल स्वप्निल कंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी सहभाग घेतला होता.









