मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
सरकारी खात्यांमधील खर्च आणि नोकरभरतीवर असलेली बंदी 30 नोव्हेंबर रोजी उठवण्यात येणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी दिली. विविध सरकारी खात्यात मिळून एकूण 10,000 पदे रिक्त असून ती भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या जाहिराती चालू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, गेल्या 2 महिन्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली असून यापुढे ती अधिक चांगली होईल. कर्मचारी निवड आयोगामार्फत (स्टाफ सिलेक्शन कमिशन) काही पदांची भरती करताना तांत्रिक अडचणी येणार असल्याने काही पदे त्या आयोगाशिवाय भरण्यात येतील, असे ते म्हणाले. सर्व पदांची भरती करताना आयोगावर मोठा ताण येऊ शकतो. म्हणून काही पदांची भरती थेट करण्यात येणार आहे.
खाणींबाबत फेरआढावा याचिका सादर करण्यात आली आहे. तथापि, कोरोना संकटामुळे त्यावरील सुनावणी सातत्याने पुढे जात असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
गेल्या काही वर्षांपासून नवीन नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सरकारी खात्यांच्या खर्चावर निर्बंध घालण्यात आले होते. या निर्णयामुळे अनेक सरकारी प्रकल्प अर्धवट राहिले होते. विविध कामांच्या निविदा, आदेश रखडले होते, हे सर्व आता 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. पोलीस खात्यात 1200 तर लेखा संचालनालयात 800 व अन्य खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत.
सरकारच्या नोकरभरतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयामुळे बेकारांना दिलासा मिळाला असून सरकार दरबारी नोकऱया मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक खात्यांची कामे खर्चावरील बंदीमुळे अडून राहिली होती. ती आता बंदी उठवण्यात येणार असल्यामुळे मार्गी लागतील, अशी आशा आहे.









