वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम हा औपचारिक क्षेत्रात काम करणाऱया नोकरदार वर्गावर मोठा नकारात्मक पडला आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन (इपीएफओ) यांच्या माहितीनुसार 1 एप्रिल 2020 ते 12 मे पर्यंत 3.5 कोटी कर्मचाऱयांनी आपल्या पीएफ खात्यामधून 1.25 लाख कोटी रुपये काढले आहेत. उपलब्ध माहितीनुसार इपीएफओच्या 6 कोटी सदस्यांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक जणांनी कोरोना कालावधीतच पैसे काढल्याचे समोर आले आहे.
1.25 कोटी रुपये काढण्यामध्ये इपीएफओकडून पीएफ, पेंशन, डेथ इन्शुरन्स आणि ट्रान्स्फरच्या पातळीवर क्लेम निकाली काढले असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये इपीएफओने 81,200 कोटी रुपयांचे क्लेम निकालात काढले आहेत.
ऍडव्हान्स सुविधा केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये इपीएफओ सदस्यांना ऍडव्हान्स देण्याची सुविधा दिली होती. याच्या आधारे सदस्यांनी आपल्या पीएफ खात्यात जमा असलेल्या रक्कमेच्या 75 टक्के म्हणजे तीन महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम काढण्याची सुविधा दिली होती.









