प्रतिनिधी / कोल्हापूर
आॕनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांवर परवाना निलंबित करुन कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी आज दिला.
कवितके म्हणाले, जिल्ह्यामधील प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असणारे धान्य १०० टक्के १ एप्रिलपूर्वी सर्व दुकानदारांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत त्याचे ९२ टक्के वाटप पूर्ण झाले आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ नियमित अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील आॕनलाईन नोंद असणाऱ्या सदस्य संख्येनुसार १०० टक्के धान्य सर्व दुकानांपर्यंत पोहोच करण्यात आले असून, त्याचेही ४४ टक्के वाटप पूर्ण झाले आहे.
यामध्ये आॕनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण करत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. अशा दुकानदारावर परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दुकानदारांनी लाभार्थ्यांना त्यांचा योग्य लाभ द्यावा. कोणतीही तक्रार येता कामा नये, याची काळजी घ्यावी. तक्रार आल्यास अशा दुकानांचे ऊर्वरित धान्य वाटप अन्य दुकानास जोडून त्यांच्यामार्फत तात्काळ करण्यात येईल.
पोर्टेबिलीटीचा लाभ
नियमित लाभार्थी सध्या दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात रहात असेल तर अशा लाभार्थ्यांने मूळ ठिकाणी धान्य घेतले नसेल तर पोर्टेबिलीटीने जवळच्या दुकानात त्याला धान्य घेता येईल. वाढलेली सदस्य संख्याही आॕनलाईनने नोंद करता येते, असेही कवितके म्हणाले.
Previous Articleराज्यात आज ३५० नवीन कोरोना रुग्ण
Next Article फुटबॉलपटू फेलानीची रूग्णालयातून सुटका








