11 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा; बार्टी, महाज्योतीच्या धर्तीवर अंमलबजावणीची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज संशोधन, मानवविकास संस्था अर्थात सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या (रजिस्ट्रेशन) तारखेपासून शिष्यवृत्ती (फेलोशिप) मिळावी, अशी मागणी गेले अनेक महिने सुरू आहे. बार्टी आणि महाज्योतीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना जर नोंदणी तारखेपासून शिष्यवृत्ती मिळत असेल तर सारथीच्या विद्यार्थ्यांबाबात दुजाभाव का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असून वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, तातडीने मागणीची अंमलबजावणी झाली नाही तर येत्या 11 एप्रिल पासून पुण्यातील सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर राज्यभरातील 551 विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडताना संभाजी खोत या प्रतिनिधीने सांगितले, नोंदणी तारखेपासून शिष्यवृत्ती लागू करावी, या मागणीसाठी आम्ही विद्यार्थी सातत्याने गेली अनेक महिने पाठपुरावा करत आहोत. राज्य शासन, त्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींना भेटलो पण त्यांनी केवळ आश्वासन दिले. त्यामुळे आता 10 एप्रिल पर्यंत निर्णय न झाल्यास 11 एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही, असा इशाराही खोत यांनी दिला.








