प्रतिनिधी/ सातारा
मागील दोन वर्ष कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आधीच बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. त्यातच रशिया व युक्रेन युद्धामुळे आता कंबरडेच मोडल्याची वेळ बांधकाम व्यवसायिकांवर आलेली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून कुठे बांधकामाना सुरूवात झाली असता आता या युद्धामुळे भयानक दरवाढीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमंतीमध्ये किमान रू 400 ते 500 पर्यंत प्रती स्केअर फुटची दरवाढ होणे अटळ आहे. बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की सट्टेबाजी किंवा नफेखोरीमुळे होत आहे. यांची देखील प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी अशी मागणी पेडाई संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी सांगितले. यावेळी विवेक निकम, सागर साळुंखे, मंगेश वाढेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन ते चार महिन्यापासून काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले आहेत. आकडेवारीनुसार यासंबंधी तपशील माहिती द्यावयाची झाल्यास बांधकाम साहित्यापैकी महत्त्वाचा घटक असलेल्या स्टीलचा दर वर्षापूर्वी प्रती टन 42 हजार रूपये होता. हा दर आता दुप्पटच म्हणजे 84 हजार इतका झाला आहे. सिमेंटचा दर 260 रूपये इतका होता. तो आता 400 रूपयांच्या घरात गेला आहे. 4 इंच विटांचा दर प्रती हजार मागे 8 हजार रूपये होता. तो 13 हजार रूपये इतका झाला आहे. वाळू व क्रश सॅडममध्येही अशी मोठी दरवाढ दिसून येत आहे.
बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रिक वायर, फीटिंगस, टाईल्स, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, ऍल्युमिनीयम सेक्शन्स व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजुरी यात देखील साधारणत 40 टक्के नी दरवाढ झाली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे बांधकाम दरामध्ये किमान रूपये 400 ते 500 प्रती स्केअर फुट वाढ झालेली आहे. बांधकाम साहित्याच्या किंमतीमध्ये अशीच दरवाढ होत राहिली किंवा किंमती आवाक्यामध्ये आल्या नाही. तर पेडाई महाराष्ट्राचे सर्व बांधकाम व्यवसायिक सभासद बांधकाम बंद करावयाचा विचार करीत आहोत.









