प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाला ऑक्टोबर 2019 पासून सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक रूप देण्यात येणार असून विमानतळाप्रमाणे टर्मिनल उभारले जाणार आहे. मध्यंतरी कोरोनामुळे रेल्वे स्थानकाच्या कामाची गती मंदावली होती. आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून, शनिवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंग यांनी भेट देऊन नूतनीकरणाचा आढावा घेतला.
बेळगावच्या रेल्वे स्थानकाची समोरील इमारत पाडण्यात आली असून, त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक परप्रांतीय कामगार गावी परतल्याने या कामाची गती मंदावली होती. यामुळे वेळेत काम पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व कामाची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
पुढील काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने रेल्वे स्थानकावर योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या. थर्मल स्क्रिनिंग करूनच प्रत्येक प्रवाशाला स्थानकात प्रवेश देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी हुबळी विभागाचे व्यवस्थापक अरविंद मलकारे व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.









